Sunak vs Truss : ब्रिटन पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीत ऋषी सुनक पिछाडीवर?, 'हे' मुद्दे ठरत आहेत कळीचे | पुढारी

Sunak vs Truss : ब्रिटन पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीत ऋषी सुनक पिछाडीवर?, 'हे' मुद्दे ठरत आहेत कळीचे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक ऋषी सुनक यांच्‍या ब्रिटनच्‍या पंतप्रधानपदाच्‍या दावेदारीवर काही प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदारांनी केलेल्‍या पाचव्‍या व अंतिम फेरीतील मतदानात सुनक हे आघाडीवर राहिले. त्‍यांना १३७ मते मिळाली. तर त्‍यांच्‍या प्रतिस्‍पर्धी आणि बोरीस जॉनसन सरकारमधील परराष्‍ट्र मंत्री लिज ट्रस यांना ११३ मत प्राप्‍त झाली आहेत. मात्र अंतिम टप्‍यात कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्‍य ( कार्यकर्ते ) मतदानाच्‍या सर्वेक्षणातील अंदाजानुसार ऋषी सुनक पिछाडीवर पडण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. या सर्वेक्षणात याची कारणेही स्‍पष्‍ट झाली आहेत.

विदेशी वंशाचा मुद्दा हाच ऋषी सुनक यांच्‍या समोरील मोठा अडसर

ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. त्‍यांच्‍या विदेशी वंशाचा मुद्दा पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीमधील मोठा अडसर ठरण्‍याची शक्‍यता असल्‍याची चर्चा इंग्‍लंडमध्‍ये सुरु झाली आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्‍यांच्‍या पत्‍नी अक्षता मूर्ति यांच्‍या नावावर इन्‍फोसिसचे शेअर आहेत. या शेअरची किंमत ही ब्रिटनच्‍या महाराणीच्‍या एकुण संपतीपेक्षा अधिक असल्‍याचे सांगितले जात असून त्‍यांची अफाट संपत्तीही त्‍यांना पंतप्रधानपदापासून लांब ठेवू शकते, असे मानले जात आहे. ऋषी सुनक हे रिचमंड, यॉर्कशायर येथून खासदार असून ब्रिटनचे अर्थमंत्री होण्यापूर्वी ते कोषागाराचे मुख्य सचिव होते. ऋषी सुनक यांनी पाच फेऱ्यांनंतर चांगली आघाडी राखली आहे. मात्र आता विदेशी वंशाचे आणि सर्वात श्रीमंत या दोन मुद्‍यांवर ते कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सुमारे १.६ लाख मतदान पोस्‍टल मतदानात पिछाडीवर जाण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

Sunak vs Truss : सर्वेक्षणात लिस ट्रस आघाडीवर

नुकताच YouGov ने कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्‍या ७३० सदयांचे सर्वेक्षण केले. यामध्‍ये ६२ टक्‍के सदस्‍यांनी लिज ट्रस यांचे तर केवळ ३८ टक्‍के सदस्‍यांनी ऋषी सुनक यांना समर्थन दिले आहे. त्‍यामुळे ते पंतप्रधानपदाच्‍या अंतिम लढतीत पिछाडीवर पडतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. सट्टेबाजार संदर्भातील वेबसाईट Oddschecker च्‍या माहितीनुसार सट्‍टेबाजारात लिज ट्रस यांच्‍या बाजूने ७५ टक्‍के कौल आहे तर ही टक्‍केवारी सुनक यांच्‍यासाठी केवळ २५ इतकीच आहे. मात्र बीबीसी टीव्‍हीवर झालेल्‍या वादविवाद कार्यक्रमानंतर घेण्‍यात आलेल्‍या ओपिनियन पोलनुसार सुनक यांना ३९ टक्‍के तर ट्रस यांना ३८ टक्‍के नागरिकांना समर्थन दिले आहे. या ओपनियन पोलमध्‍ये १०३२ मतदार सहभागी झाले होते. एकुणच सर्वक्षण आणि सट्‍टेबाजारातील बोली यावरुन ऋषी सुनक यांचा पंतप्रधानपदापर्यंत पोहचण्‍याचा मार्ग सोपा नाही हे स्‍पष्‍ट झाले आहे.

Sunak vs Truss : माजी पंतप्रदान जॉनसन यांचेही ट्रस यांना समर्थन

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचेही लिज ट्रस यांना समर्थन आहे. कारण जॉनसन यांच्‍या मंत्रीमंडळातून सर्वात पहिल्‍यांदा अर्थमंत्री असणार्‍या ऋषी सुनक यांनीच राजीनामा दिला होता. त्‍यामुळे जॉनसन हे पंतप्रधानपदावरुन पायउतार होण्‍यास सुनक यांनाच कारणीभू मानतात. त्‍यामुळे त्‍यांनी सुनक यांच्‍याविरोधात मोर्चाच उघडला आहे. सुनक यांचे समर्थन करु नये, असे आवाहन त्‍यांनी पक्षातील नेत्‍यांना केले आहे. ब्रिटननमधील मीडियाच्‍या अंदाजानुसार बोरिस जॉनसन हे लिज ट्रस यांच्‍या समर्थन करण्‍यासाठी इच्‍छुक आहेत.

ब्रिटनमध्‍ये अशी होते कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्‍या नेत्‍याची निवड

सध्‍या ब्रिटनमध्‍ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाची सत्ता आहे. त्‍यामुळे याच पक्षाचा नेता हा आगामी पंतप्रधान होणार आहे. याची घोषणा ५ सप्‍टेंबर रोजी होणार आहे. पक्षाच्‍या नेतृत्‍वाची निवडणूक ही दोन टप्‍प्‍यात होते. पहिल्‍या टप्‍प्‍यात पक्षाच्‍या खासदारांचे मतदान होते. कमी मतदान होणारे उमेदवार पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीमधून बाहेर पडतात. अखेर दोघांची निवड होते. यंदा अंतिम दोन उमेदवार ऋषी सुनक आणि लिज ट्रस आहेत. विशेष म्‍हणजे, यंदा ५ फेर्‍यामध्‍ये खासदारांचे मतदान झाले. यामध्‍ये ऋषी सुनक हे आघाडीवर राहिले आहेत. ट्रस या चौथ्‍या व अंतिम पाचव्‍या फेरीत दुसर्‍या स्‍थानी राहिल्‍या. खासदारांच्‍या मतदानानंतर कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सदस्‍य ( कार्यकर्ते ) मतदान करतात. या मतदानापूर्वी यंदा पहिल्‍या दोन स्‍थानांवर असणार्‍या दावेदारांची टीव्‍हीवर चर्चा झाली आहे. आता कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे सुमारे १.६ लाख सदस्‍यांचे पोस्‍टल मतदान करणार आहेत. पक्षाच्‍या सदस्‍यांनी बहुतम दिलेला नेताच ५ सप्‍टेंबर रोजी ब्रिटनच्‍या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button