युक्रेनमधील शॉपिंग मॉलवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १६ ठार, ५९ जखमी | पुढारी

युक्रेनमधील शॉपिंग मॉलवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, १६ ठार, ५९ जखमी

कीव्ह; पुढारी ऑनलाईन : युक्रेनमधील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या क्रेमेनचुकमधील एका शॉपिंग मॉलवर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात १६ जण ठार झाले आहेत. तर ५९ जण जखमी झाले असल्याची माहिती युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने दिली आहे. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मॉलला मोठी आग लागली आहे. मॉल परिसरात मोठ्या आगीच्या ज्वाळा व धुरांचे लोट दिसत आहेत.

या हल्ल्यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू आणि ५९ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहेत, त्यापैकी २५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती घेत असल्याचे आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांनी टेलिग्रामवरून सांगितले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ढिगारा हटवणे आणि आग विझवण्याचे काम सुरु आहे.

“मॉलला आग लागली आहे. बचावकार्य करणारे कर्मचारी आगीशी झुंज देत आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या कल्पनेच्या पलीकडे आहे,” असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मॉल आगीत जळत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button