वडिलांचा पबजीला नकार; तरुणाने केली आत्महत्या | पुढारी

वडिलांचा पबजीला नकार; तरुणाने केली आत्महत्या

पाटणा : वृत्तसंस्था

मोबाईल गेम पबजीचे व्यसन केवढे घातक आहे हे काही दिवसांपूर्वी लखनौ येथील घटनेने पाहायला मिळाले होते. तिथे पबजी खेळू देत नाही या कारणामुळे राग येऊन सोळा वर्षीय मुलाने आपल्या आईची गोळ्या घालून हत्या केली होती. आता पाटणा या बिहारच्या राजधानीत वडिलांनी मोबाईलवर पबजी खेळू दिला नाही याचा राग आल्याने एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना पाटणा जिल्ह्यातील अथमलगोला पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बहादूरपूर गावातील आहे. राजा कुमार नावाच्या तरुणाला त्याचे वडील रमाकांत यांनी पबजी खेळण्यास मनाई केली, तेव्हा राजाचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्याने रविवारी गळफास घेऊन स्वतःला संपवून टाकले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Back to top button