स्वातंत्र्यदिनी ऑफर्सच्या धमाक्यात ग्राहकांचे स्वागत | पुढारी

स्वातंत्र्यदिनी ऑफर्सच्या धमाक्यात ग्राहकांचे स्वागत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या विळख्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठा 15 ऑगस्ट रोजी मुक्‍त होत आहेत. ऑफर्सच्या धमाक्यांनी स्वातंत्र्यदिनी ग्राहकांचे दुकानांमध्ये उत्साहात स्वागत होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सर्वाधिक ऑफर्स असून ग्राहकांचे काही ठिकाणी गुलाबपुष्प, पेढे देऊन स्वागत करण्याची जय्यत तयारी व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल अपेक्षित आहे.

कोरोना संसर्ग काळात नियमांच्या जोखडात व्यावसायिकांचा जीव गुदमरला होता. आता मात्र मुक्‍तपणे व्यवसाय करण्याची संधी असल्याचे काही व्यापार्‍यांनी सांगितले. राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आज (दि. 15) पासून सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. दुकानांची वेळ वाढवून दिल्याने तब्बल 115 दिवसांनी सर्व दुकाने सुरळीत आणि उत्साहात सुरू होणार आहेत.

राज्यातील अन्य जिल्ह्यात निर्बंध शिथिल होत असताना कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद होता. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याने कोल्हापुरात तीन महिन्यापूर्वी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करण्यात आला. नंतर आरटीपीसीआर रेट दहाच्या आत आल्यानंतर दुकाने सुरू करण्यास परवानगी न दिल्याने व्यापार्‍यांनी आंदोलन केले. त्यानंतर एक आठवडा शहर व जिल्हा वेगळा करून आठ दिवसांसाठी शहरातील सर्व दुकाने सुरू झाली. पण नंतर शासनाने पुन्हा यावरही बंदी आणली.

व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असताना शासनाने 15 ऑगस्टपासून सर्व दुकाने सुरू करण्याला परवानगी देत दुकानांची वेळ सकाळी सात ते रात्री दहापर्यंत केली.

या शासन निर्णयाचे व्यापारी संघटनांनी स्वागत केले. नियमानुसार सर्व दुकाने, हॉटेल्स, मंगल कार्यालये, शॉपिंग मॉल्स सुरू होणार आहेत. गेल्यावेळी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तानंतर प्रथमच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्राहक वस्तू खरेदी करणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकानांनी विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशिन, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे.

तीन रंगांनी सजली दुकाने

देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन व कोरोना निर्बंध शिथिल झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक व्यापार्‍यांनी तिरंगी फुगे, हार, फुले लावून दुकानांची सजावट केली आहे. विद्युत रोषणाईनेही अनेक दुकाने उजळून निघाली असून कोल्हापूरकर दीड वर्षाने प्रथमच रात्री दहापर्यंतची वर्दळ अनुभवणार आहेत.

पेढे, गुलाबपुष्प देऊन स्वागत होणार

शहर व जिल्ह्यातील अनेक दुकानांनी ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या आहेत.

चारचाकी, दुचाकी, टीव्ही, मोबाईलच्या ऑफर्सचा वर्षाव

इलेक्ट्रॉनिक्स दुकानांनी विविध ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशिन, दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीवर ऑफर्सचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 10 ते 50 टक्के सूट

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर रोख पैशात डिस्काऊंट, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, साऊंड सिस्टीम, फ्रिज, वॉशिंग मशिन तसेच होम अप्लायन्सच्या खरेदीवर ऑफर्सचा धमाका देण्यात आला आहे. यापूर्वी दुकाने बंद असल्याने ग्राहकांना या वस्तू खरेदीला मर्यादा होत्या. आता विविध वस्तूंवर 10 टक्केपासून 50 टक्के ऑफर्स देण्यात येणार असल्याचे राजाकाका ई मॉलचे संचालक दीपक केसवानी यांनी सांगितले.

Back to top button