

कर्जत : पुढारी वृत्तसेवा
आमदार रोहित पवार यांनी आयोजिलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीला विविध परिसरातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुरुवारी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. काळजाचा ठोका चुकविणार्या या स्पर्धेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. बिर्र आवाजाने आज कर्जत शहर दुमदुमले!
यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी कमी झाल्याचेही निदर्शनास येते; पण अशा स्पर्धा आयोजिल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल. आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे, असे आमदार रोहित पवार म्हटले.
यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार, आमदार अनिल पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके, आमदार राजू नवघरे, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार संजय शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार यशवंत माने, आमदार इंद्रनील नाईक, आमदार अतुल बेनके, आमदार ऋतुराज पाटील, आमदार झीशान सिद्दिकी, आमदार राहुल जगताप यांचा समावेश होता.