उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आणीबाणी जाहीर, संपूर्ण देश लॉकडाउन | पुढारी

उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आणीबाणी जाहीर, संपूर्ण देश लॉकडाउन

प्योंगयांग; पुढारी ऑनलाईन

जगभरात गेली अडीच वर्षे कोरोनाने हाहाकार घातला होता. पण आता कुठे उत्तर कोरियाने कोरोनाच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांनी देशात गंभीर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळून आल्याने महामारीचा समूळ नायनाट करण्यासाठी देशव्यापी लॉकडाउनचे आदेश त्यांनी दिले आहेत. देशातून कोरोना व्हायरस नष्ट करण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

KCNA वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, रविवारी प्योंगयांगमध्ये तापाने आजारी असलेल्या एका रूग्णांचे नमुने घेतले होते. ते ओमायक्रॉन व्हेरियंटशी मिळतेजुळते असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर किम जोंग-उन यांनी देशातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली आणि कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

KCNA च्या वृत्तात म्हटले आहे की किम यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना कमी वेळेत कोरोना महामारीचे मूळ नष्ट करण्यावर भर द्या असे आदेश दिले आहेत. किम यांनी सीमांवर नियंत्रण ठेवा आणि कडक लॉकडाउन लागू करण्याबाबतही आदेश दिलेत.

कारखाने, व्यवसाय आणि घरे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे वृत्त KCNA ने दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियाने २०२० च्या अखेरीस १३,२५९ कोविड-१९ चाचण्या केल्या होत्या. त्या सर्व निगेटिव्ह आल्या. आरोग्य क्षेत्रातील विश्लेषकांनी म्हटले आहे की उत्तर कोरियाच्या कमकुवत आरोग्य यंत्रणेला महामारीच्या उद्रेकाचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

उत्तर कोरियाने त्यांच्या अडीच कोटी लोकांचे लसीकरण केलेले नाही. त्यांनी लस पुरवठा करण्याबाबत आलेल्या ऑफरही नाकारल्या होत्या.

Back to top button