कोल्हापूर : कोरोना महामारीत ‘त्यांची’ जीवाची बाजी | पुढारी

कोल्हापूर : कोरोना महामारीत ‘त्यांची’ जीवाची बाजी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांना अहोरात्र सेवा देणार्‍या परिचारिकांचे जीवन कष्टमय आहे. पण कोरोना महामारीच्या कसोटीच्या प्रसंगातही त्यांनी जीवाची बाजी लावली. कोरोनाबाधितांच्या जीवनात आनंद फुलविण्यासाठी त्यांनी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.

दरवर्षी 6 ते 12 मे आठवडा जगभर आंतरराष्ट्रीय नर्सेस (परिचारिका) सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कोरोना महामारीतील परिचारिकांचे हे काम अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. वैयक्तिक अडीअडचणीकडे दुर्लक्ष करत त्यांच्याकडून रुग्णसेवा सुरू आहे.

फ्लॉरन्स नाईटिंगेल यांनी प्रथम रुग्ण सेवेला सुरुवात केली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त प्रत्येक वर्षी 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. दुसर्‍या महायुद्धावेळी फ्लॉरन्स यांनी जखमी सैनिकांची सुश्रुषा केली. तर कोरोना महामारीतही परिचारिकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. आज जगभरात हजारो भगिनींना नर्सिंगच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळाली आहे. रोजगाराची संधी लक्षात घेऊन 1860 मध्ये लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापना झाली. फ्लॉरेन्स यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळे आज जगभरात परिचारिकांना महत्त्व आहे. महाराष्ट्रात सुमारे सव्वातीन लाख परिचारिका रुग्ण सेवेत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा मोजक्याज नर्सेसच्या खांद्यावर आहे. बदलत्या वैद्यकीय क्षेत्रात या नर्सेसना भेडसावणार्‍या समस्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यांना कायद्याचे भक्कम संरक्षण गरजेचे आहे. ग्रामीण भागातील परिचाकांवर लसीकरण, प्रसूती, कुटुंब कल्याणसारख्या अनेक जबाबदार्‍या आहेत. त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. जागतिक परिचारिका दिनानिमित्त त्यांच्या वैद्यकीय सेवेला सलाम.

Back to top button