मॉस्को : वृत्तसंस्था
जसा काळ बदलला, तसा युद्धाच्या तंत्रातही सातत्याने बदल होत गेला. अनेक तंत्रे आणि शस्त्रे विकसित करण्यात आली. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे युक्रेनबरोबर युद्ध सुरू असताना आता रशियाने हेरगिरीसाठी डॉल्फिन माशांना युद्ध मैदानात उतरविले आहे. डॉल्फिन हा सर्वात हुशार मासा मानला जातो. त्याचा वापर रशियाकडून हेरगिरीसाठी केला जातो, हे अविश्वसनीय आहे. डॉल्फिन माशांना प्रशिक्षण देऊन त्यांना काळ्या समुद्रात नौसेनेच्या अड्ड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले आहे. सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून अमेरिकेच्या नेव्हल इन्स्टिट्यूटने हा खुलासा केला आहे.
रशियन लष्कराने सेवस्तोपोल बंदराच्या प्रवेशद्वाराजवळ डॉल्फिन माशांना तैनात केले आहे. सेवस्तोपोल बंदर क्रिमियाच्या पेनिनसुलाच्या दक्षिण दिशेला आहे. 2004 मध्ये या भागावर रशियाने कब्जा केला आहे.शीत युद्धकाळापासून हे तंत्रज्ञान रशियाने विकसित केले आहे. डॉल्फिन मासा पाण्यात आवाज आणि रेंजद्वारे शत्रूला डिटेक्ट करतो. डॉल्फिनच्या हालचालींवरून सिग्नल मिळतो आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यास मदत होते. दरम्यान, केवळ रशियाच नव्हे, तर अमेरिका आणि युक्रेनकडूनही डॉल्फिन माशांना प्रशिक्षण दिले जाते.
युद्धकाळात डॉल्फिन्ससह रशियाने बेलुगा व्हेल माशांनाही रशियाने प्रशिक्षण दिले आहे. 2019 मध्ये बेलुगा व्हेल हा मासा समुद्रात आढळला होता. या माशाला कॅमेरा आणि हॉर्न लावण्यात आले होते आणि तो आमच्या जहाजांना ओढत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.