Russia Vs America : डॉलरला शह देण्यासाठी रशियाची चाणाक्ष खेळी

Russia Vs America : डॉलरला शह देण्यासाठी रशियाची चाणाक्ष खेळी
Published on
Updated on

मॉस्को ; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या (Russia Vs America) शक्तिशाली डॉलरला शह देणे आणि आपले चलन भक्कम करणे अशा दुहेरी हेतूने रशियाच्या मध्यवर्ती बँकेने रुबल या चलनाला थेट सोन्याशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक ग्रॅम सोन्याची किंमत पाच हजार रुबल अशी निश्चित करण्यात आली आहे.

रशिया हा जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा उत्पादक देश आहे. तसेच त्या देशात इंधनाचेही साठे मोठ्या प्रमाणात आहेत. नैसर्गिक वायू आणि जीवाश्म इंधन म्हणजेच कच्च्या तेलाची विक्री रशिया जगातील विविध देशांना करत आला आहे. आता ज्या देशांना रशियाकडून नैसर्गिक वायू किंवा कच्चे तेल खरेदी करायचे आहे, त्यांना त्यासाठी एक तर रुबल किंवा तेवढ्या रकमेचे सोने चुकते करावे लागेल. त्यामुळे या सगळ्या व्यवहारांमध्ये डॉलरचा कुठेही संबंध येणार नाही.

सध्या अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावले आहेत. त्याचा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रशियाच्या मध्यवर्ती बँकेने (सेंट्रल बँक ऑफ रशिया) रुबलला सोन्याशी जोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. अर्थात, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने केल्या जाणार आहेत. यातून रुबल हे रशियन चलन जागतिक पातळीवर भक्कम होत जाणार असून, रशियाला त्याचा मोठा फायदा होईल. (Russia Vs America)

रशियाने यापुढील काळात युरोपीय समुदायातील देशांना नैसर्गिक वायू अथवा कच्चे तेल खरेदी करण्यासाठी फक्त रुबल अथवा सोन्याद्वारेच व्यवहार करण्यास सांगितले आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत डॉलर किंवा युरो स्वीकारणार नाही, असेही रशियाने संबंधित देशांना बजावले आहे.

पुतीन यांचा मास्टर स्ट्रोक!

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांनी रुबलला सोन्याशी जोडण्याची जी खेळी केली आहे ती अतिशय चाणाक्ष म्हटली पाहिजे. सध्या एका डॉलरसाठी रशियाला सुमारे शंभर रुबल मोजावे लागत आहेत. मात्र, नजीकच्या भविष्यात रशियाला रुबल अथवा सोने देऊनच नैसर्गिक वायू किंवा कच्चे तेल खरेदी करावे लागणार असल्यामुळे डॉलर आणि युरो यांचे जागतिक बाजारातील महत्त्व वेगाने कमी होऊ शकेल. यातून अमेरिका आणि युरोपातील उद्योगसंपन्न देशांची जागतिक बाजारावरील पकडदेखील सैल होऊ शकेल. एक प्रकारे पुतीन यांचा हा मास्टर स्ट्रोकच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news