Imran Khan rally : पंतप्रधान इम्रान खान यांचे इस्‍लामाबादमध्‍ये शक्‍तिप्रदर्शन, कार्यकाळ पूर्ण करण्‍याचा निर्धार | पुढारी

Imran Khan rally : पंतप्रधान इम्रान खान यांचे इस्‍लामाबादमध्‍ये शक्‍तिप्रदर्शन, कार्यकाळ पूर्ण करण्‍याचा निर्धार

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्‍याविरोधात सोमवारी ( दि. २८) संसदेत अविश्‍वास ठराव सादर केला जाणार आहे. (  Imran Khan rally ) रविवारी त्‍यांनी इस्‍लामाबादमध्‍ये रॅलीचे आयोजन करत शक्‍तिप्रदर्शन केले. मी सर्वप्रथम देशवासियांसह तुम्‍हा सर्वांचे आभार मानतो. देशाच्‍या विकासासाठी मी राजकारणात आला आहे. मी राजीनामा देणार नाही. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारच, असा विश्‍वास त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केला.

या वेळी इम्रान खान म्‍हणाले की, मी माझ्‍या सर्व सहकार्‍यांचे आभार मानतो. तुम्‍हाला अनेकांनी पैसे देण्‍याचा प्रयत्‍न केला; पण तुम्‍ही पक्षाशी एकनिष्‍ठ राहिला आहात. याचा मला अभिमान आहे. पाकिस्‍तानला जगातील एक कल्‍याणकारी मुस्‍लिम राष्‍ट्र करणे हेच आपले स्‍वप्‍न आहे.

Imran Khan rally : विराेधी पक्ष नेत्‍यांवर हल्‍लाबाेल

पाकिस्‍तानमधील विरोधी पक्ष नेते बिलावल भुट्‍टो, मरियम नवाज आणि मौलाना फजलुर रहमान यांच्‍यावर हल्‍लाबोल करताना इम्रान खान म्‍हणाले की,  ३० वर्षांहून अधिक काळ विराेधी पक्षांनी देशातील जनतेचे शाेषण केले आहे. त्‍यांच्‍या मालमत्ता डॉलरमध्‍ये आहेत. मी पंतप्रधान पदाची सूत्रे स्‍वीकारल्‍यापासून मला विराेधी पक्षांकडून ब्‍लॅकमेल केले जात आहे. त्‍यांनी पाकिस्‍तानला कर्जाच्‍या खाईत लोटले आहे. सत्ता असो की नसो मी पाकिस्‍तानविरोधात काम करणार्‍यांना कधीच माफ करणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

यावेळी सभेत बोलताना इम्रान खान यांच्‍या मंत्रीमंडळातील नियोजन मंत्री असद उमर म्‍हणाले की, इम्रान खान हे भ्रष्‍ट विरोधकांविरोधात लढा देत आहेत. त्‍यांच्‍या विरोधात अविश्‍वास ठराव मांडला जाणार आहे. निश्‍चितच ते ही लढाई जिंकतील. तसेच त्‍यांनी नव्‍याने निवडणूक घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी केले. यावेळी संरक्षण मंत्री परवेझ खतिक म्‍हणाले की, मागील काही दिवसांपासून देशातील विरोधी पक्षांचे सत्तेसाठी रडगाणे सुरु आहे. आगामी निवडणुकीत तुम्‍ही इम्रान खान यांच्‍या पाठीशी रहा. कारण त्‍यांच्‍या सरकारने कर वसुलीपासून अनेक मुद्‍यांवर ठोस भूमिका घेतली आहे. इम्रान खान हे एक प्रामाणिक नेते आहे, असेही त्‍यांनी नमूद केले.

इम्रान खानच्‍या मंत्रीमंडळातील ५० मंत्री ‘नॉटरिचेबल’

पाकिस्‍तानमधील इम्रान खान यांच्‍या तहरीक-ए-इन्‍साफ ( पीटीआय) पक्षाच्‍या ५० मंत्री नॉटरिचेबल आहेत. मागील काही दिवस हे मंत्री पक्षाचाही संपर्कात नाहीत, असा दावा पाकिस्‍तानमधील माध्‍यमांकडून केला जात आहे. दरम्‍यान, सोमवारी इस्‍लामाबादमध्‍ये विरोधी पक्षांची आघाडी एक सभा घेणार आहे. यामध्‍ये जमिय ए इस्‍लाम फज्‍ल आणि पाकिस्‍तान मुस्‍लिम लीग -नवाज या पक्षाचे नेतेही सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षाचे शक्‍तीप्रदर्शन हे संसदेचे कामकाज सुरु झाल्‍यानंतर होईल. एकीकडे इम्रान खान यांच्‍यावर अविश्‍वास ठराव दाखल केला जाईल. तर दुसरीकडे रस्‍त्‍यावर उतरुन त्‍यांच्‍या विरोध केला जाईल, असे विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांनी म्‍हटलं आहे.

कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी राजीनामा

कॅबिनेट मंत्री शाहजहान बुगती यांनी राजीनामा दिला आहे. बलुचिस्‍तानच्‍या चमुरी वतन पक्षाचे नेते  बगुती हे इम्रान खानच्‍या सरकारमध्‍ये मंत्री होते. तसेच त्‍यांच्‍या तहरीक-ए-इन्‍साफ ( पीटीआय) पक्षाचे ५० मंत्रीही नॉटरिचेबल आहेत. त्‍यामुळे इम्रान खान यांच्‍यावरील राजकीय संकट अधिक गडद होत चालले असल्‍याची चर्चा पाकिस्‍तानच्‍या राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button