चीन पाकिस्तानला देणार फायटर जेटसह पाणबुड्या; भारताचं वाढलं टेन्शन | पुढारी

चीन पाकिस्तानला देणार फायटर जेटसह पाणबुड्या; भारताचं वाढलं टेन्शन

इस्लामाबाद; पुढारी ऑनलाईन : लडाखमध्ये भारतीय भूमी काबीज करण्याचा प्रयत्न करणारा चीन आता भारताच्या कट्टर शत्रूला प्राणघातक शस्त्रांनी सज्ज करणार आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तान दौऱ्यादरम्यान घातक पाणबुड्यांसह अत्याधुनिक लढाऊ विमाने पाकिस्तानला पुरवण्याचे मान्य करण्यात आले आहे. हे तेच वांग यी आहेत जे पाकिस्तानला भेट देऊन भारतात आले आहेत. या महत्त्वाच्या संरक्षण कराराच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान मोठी झेप घेणार आहेत. चीनचे हे पाऊल प्रतिस्पर्धी भारतावर दुटप्पी दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

दक्षिण आशियामध्ये संरक्षण विस्तार वाढवण्याचे चीनचे लक्ष्य आहे, ज्यामुळे या भागात त्याचा प्रभाव आणखी वाढेल. चीनच्या संरक्षण सहकार्यात अशा वेळी वाढ झाली आहे जेव्हा अमेरिका आणि युरोप रशिया-युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे लक्ष देत आहे. ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत (सीएफएम) विशेष पाहुणे प्रतिनिधी म्हणून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी उपस्थित होते. इस्लामाबादच्या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की, “अडचणींवर मात करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तानला मदत करण्यासाठी बीजिंग कटिबद्ध आहे”.

पाकिस्तानला दिली 6जे-10सीई लढाऊ विमाने

या महिन्याच्या सुरुवातीला चीनने संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून पाकिस्तानला 6जे-10सीई लढाऊ विमाने सुपूर्द केली. बुधवारी इस्लामाबादमधील पाकिस्तान दिनाच्या परेडमध्ये 6जे-10सीई जेट विमाने देखील होती, ज्यामध्ये पाकिस्तानने आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. 6जे-10सीई हे 4.5-जनरेशनचे लढाऊ विमान आहे, जे क्षमतेच्या बाबतीत F-15 आणि F-35 स्टेल्थ फायटरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने चीनसोबत संयुक्तपणे विकसित केलेली किमान ५० नवीन JF-17 लढाऊ विमानेही आपल्या ताफ्यात सामील केली आहेत.

चीनचे पाकिस्तानसोबत वाढलेले संरक्षण सहकार्य हे भारताने अलीकडेच विकत घेतलेल्या रशियन S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीशी थेट जोडलेले आहे. पाकिस्तानसोबत चीनचे वाढलेले संरक्षण सहकार्य हे भारतीय हवाई कारवाईच्या संभाव्य धोक्याला प्रतिसाद म्हणून पाहिले जात आहे. चीन पाकिस्तानची नौदल क्षमताही मजबूत करत आहे.

पाकिस्तानचा चीनकडून पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार

इंडो-पॅसिफिक सी लेनमधील संभाव्य भारतीय धोक्याचा सामना करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. पाकिस्तान चीनकडून आठ पाणबुड्या विकत घेण्याचाही विचार करत असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान याद्वारे आपल्या नौदलाचा कणा मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. किमान चार पाणबुड्या चीनमध्ये बांधल्या जातील आणि उर्वरित पाकिस्तानात बांधल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे भारतीय सीमेवर 60 हजार सैनिक तैनात करणारा चीन आता पाकिस्तानच्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Back to top button