पाकिस्तान : धर्मांतराला नकार दिल्याने पाकमध्ये हिंदू युवतीची हत्या

पाकिस्तान : धर्मांतराला नकार दिल्याने पाकमध्ये हिंदू युवतीची हत्या
Published on
Updated on

कराची ; वृत्तसंस्था : पाकिस्तान मधील सिंध प्रांतात सोमवारी एका हिंदू युवतीची डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. धर्मांतर करून बळजबरी लग्‍नाला विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली. पूजा कुमारी ओड (वय 18) असे तिचे नाव असून, ती सुक्कूर जिल्ह्यातील आहे.

पोलिसांनी मुख्य आरोपी वाहिद बख्श लशारी याला अटक केली आहे. लशारीकडून शस्त्रही जप्‍त केले आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहिद बख्श लशारी लग्न करण्यासाठी पूजाचे अपहरण करू इच्छित होता.

पूजाच्या वडिलांनी 'इंडिपेंडन्ट उर्दू'शी बोलताना सांगितले की, सिंधमध्ये हिंदू मुलींची अपहरणे आणि धर्मांतरे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. हिंदू मुलींना कुटुंबासह संपविण्याच्या धमक्या दिल्या जातात. नंतर मुलींनी त्यांच्या मर्जीने इस्लाम स्वीकारल्याचे दाखविण्यात येते.

माझ्या मुलीने लग्‍न आणि धर्मपरिवर्तनाला स्पष्ट नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. वाहिद बख्श लशारी एकदा माझ्या घरात जबरदस्तीने घुसला होता. आम्ही पोलिसांकडे संरक्षण मागितले; पण त्यांनी नकार दिला. घटनेनंतर युवतीचा मृतदेह महामार्गावर ठेवून नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

दरवर्षी एक हजार हिंदू मुलींचे अपहरण

अमेरिकेतील सिंधी फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार सिंध प्रांतात दरवर्षी एक हजार हिंदू मुलींचे (वय 12 ते 28) अपहरण केले जाते. दम देऊन धर्मपरिवर्तन केले जाते आणि नंतर तिचा निकाह लावून दिला जातो.

अल्पसंख्याकांसाठी नरकयातना

पाकिस्तान सरकार अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणाची ग्वाही अधूनमधून देत असते; पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. हिंदू, ख्रिस्ती, शीख, अहमदिया आणि शिया पंथियांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news