Russia Ukraine War : पुतीन यांनी जानेवारीतच दिली हल्ल्यास मंजुरी | पुढारी

Russia Ukraine War : पुतीन यांनी जानेवारीतच दिली हल्ल्यास मंजुरी

कीव्ह / मॉस्को; वृत्तसंस्था : युक्रेनसोबत युद्धाचा (Russia Ukraine War) रशियाची गुप्त योजना आता उघड झाली आहे. यातून रशियाच्या संपूर्ण कटाचा उलगडा होत असून केवळ 15 दिवसांत युक्रेनवर ताबा मिळवण्याची रशियाची योजना होती. तसेच युक्रेनवर हल्ल्याची परवानगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जानेवारी महिन्यातच दिली होती, असेही यातून समोर आले आहे.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हाती रशियाच्या (Russia Ukraine War) या योजनेबाबतचे काही दस्तऐवज लागले आहेत. रशियन बटालियनच्या टॅक्टिकल ग्रुपच्या युनिटमधील एका ट्रुपच्या प्लॅनिंगशी संबंधित हे दस्तऐवज आहेत. हे सर्व दस्तऐवज युक्रेनने फेसबुक हँडलवरून शेअर केले आहेत. या योजनेनुसार 20 फेब्रुवारी ते 6 मार्च या काळात रशियन फौजा युक्रेनवर हल्ला करून युक्रेनवर ताबा मिळविणार होती. युक्रेन युद्धाची पटकथा मॉस्कोमध्ये 18 जानेवारी रोजीच लिहिली गेली होती. पुतीन यांनी त्याच दिवशी या बॅटल प्लॅनला मंजुरी दिली होती.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने (Russia Ukraine War) म्हटले आहे की, घाईगडबडीत आणि घाबरलेल्या अवस्थेत रशियन सैनिक हे गुप्त दस्तऐवज विसरून गेले. या दस्तऐवजात एक वर्क कार्ड, कॉम्बॅट मिशन, कॉल साईन टेबल, कंट्रोल सिग्नल टेबल, हिडन कंट्रोल टेबल अशी युद्धाबाबतची महत्त्वाची माहिती तसेच सैनिकांची यादी आहे. युक्रेनच्या ज्वॉईंट फोर्सेस ऑपरेशन्स कमांड यांनी सांगितले की, हे युक्रेनच्या सैन्याचे यश आहे. रशियन फौजेतील जवान तर मरताहेतच पण त्यांची उपकरणेही आमच्या हाती लागत आहेत. दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी पुतीन यांनी युक्रेनवर हल्ल्याचा आदेश दिला होता. अजूनही हे युद्ध सुरू आहे.

फुटबॉल खेळत असताना अंगणात पडला बॉम्ब

कीव ः युक्रेनच्या मारियापोल भागात घराच्या अंगणात तीन लहान मुले फुटबॉल खेळत असताना एक रशियन बॉम्ब तिथे पडून फुटला. त्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला असून उर्वरीत दोघे बालक गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृत बालकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इलिया असे या मुलाचे नाव आहे. या तिन्ही मुलांना फुटबॉलपटू व्हायचे होते, पण उर्वरीत दोघेही आता परत कधीही फुटबॉल खेळू शकणार नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. इलियाचे मित्र एविड आणि एर्तोेएम यांच्या शरीरावर गोळीबाराच्याही खुणा आहेत. या दोघांवर उपचार सुरू आहेत.

Back to top button