कीव्ह / मास्को : पुढारी ऑनलाईन
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगावर चिंतेचे ढग दाटले आहेत. आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने चौथ्या दिवशी रशियाने अधिक आक्रमक होत युक्रेनची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, युक्रेनने आज रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात
( International Court ) धाव घेतली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भातील माहिती ट्विट करत दिली.
युक्रेनच्या अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दिलेल्या अर्जात म्हटलं आहे की, युक्रेनमधील नागरिकांच्या हत्येला रशियाला जबाबदार धरले पाहिजे. न्यायालयाने रशियाला त्वरित युक्रेनविरोधातील कारवाई थांबविण्याचे आदेश द्यावेत. याप्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी सुरु करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
रशियाने युक्रेनसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. चर्चेसाठी बेलारुसला एक शिष्टमंडळ पाठवले आहे. मात्र युक्रेनने रशियासमोर चर्चेपूर्वी आपली अट ठेवली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी बोलारुस येथे चर्चेस नकार दिला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, रशिया बेलारुसचा वापर एका लष्करी तळाप्रमाणे करत आहे. या ठिकाणी आम्ही चर्चा करु शकत नाही. रशियाला खरच गंभीरपणे चर्चा करायची असेल तर त्यांना चर्चेचे ठिकाण बदलावे लागेल. त्यांनी या चर्चेसाठी पोलंड, तुर्की हंगेरी, अजरबैजान, स्लोवाकिया येथे रशियाने आपले शिष्टमंडळ पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
युक्रेनकडून रशियाला चोख प्रत्युत्तर मिळत आहे. ७२ तासांनंतरही रशियन सैन्याला कीव्हवर कब्जा करता आलेला नाही. आता रशियाने विनाअट चर्चेची तयारी दर्शवली आहे. युक्रेनचे सैनिकांनी शरणागती पत्करल्यानंतरच चर्चा होईल, अशी अट रशियाने ठेवली होती. मात्र ही अट धुडकावत आम्ही शस्त्र टाकणार नाही, कोणत्याही परिस्थिती झुकणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झोलेन्स्की यांनी रशियाला ठणकावले होते. आता त्यांनी बेलारुस येथे चर्चा नको, ही त्यांची अट रशिया मान्य करणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचलं का?