

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेश (D Gukesh) याने इतहास रचला आहे. एमचेस रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत त्याने जगातील नंबर वन खेळाडू जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला हरवले आहे. या कामगिरीमुळे तो वर्ल्ड चॅम्पियनला हरवणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. चेन्नईच्या गुकेशने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत २९ चालींमध्ये विजय मिळवला. गुकेश आता १२ फेऱ्यानंतर २१ गुणांसह पोलंडचा जॅन-क्रिझिस्टोफ डुडा (२५ गुण) आणि अझरबैजानचा शाखरियार मामेदियारोव (२३ गुण) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. याआधीच्या दिवशी भारताच्या १९ वर्षीय अर्जुने एरिगेसीने कार्लसनला हरवले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुकेशने (D Gukesh) कार्लसनला दुसरा धक्का दिला.
"मॅग्नसला पराभूत करणारा गुकेश हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे! १६ वर्षीय भारतीय सुपरस्टारला सलाम," असे मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरने त्याच्या ट्विटर फीडवर म्हटले आहे. गुकेशचे वय सध्या १६ वर्षे ४ महिने २० दिवस आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये १६ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद (Indian Grandmaster Praggnanandhaa Rameshbabu) याने एअरथिंग्स मास्टर्स (Airthings Masters) बुद्धिबळ स्पर्धेत ५ वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसन (world champion Magnus Carlsen) याचा पराभव केला होता. प्रज्ञानंद त्यावेळी १६ वर्षे ६ महिने आणि १० दिवसांचा होता.
गुकेशला १०व्या फेरीत डुडा याने हरवले होते. पण पुढच्या दोन फेऱ्यांमध्ये मामेदियारोव आणि एरिक हॅन्सन यांना पराभूत करत त्याने शानदार पुनरागमन केले. भारताचा अर्जुने एरिगेसीचे गुकेश एवढेच (२१) गुण आहेत आणि तो चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात झालेल्या ज्युलियस बेअर जनरेशन कप ऑनलाइन इव्हेंटमध्ये प्रज्ञानंद आणि एरिगेसीने कार्लसनला हरवले होते. आता कार्लसनला विजय मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
हे ही वाचा :