India vs West Indies : आजपासून टी-20 ची लढाई

India vs West Indies : आजपासून टी-20 ची लढाई
Published on
Updated on

कोलकाता ; वृत्तसंस्था : रोहित सेनेने एकदिवसीय मालिकेत 3-0 असे निर्विवाद यश मिळविानंतर भारत-वेस्ट इंडिज (INDIA Vs WEST INDIES) टी-20 मालिका बुधवार (दि.16) पासून सुरू होणार असून, ऑक्टोबर महिन्यात होणार्‍या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी योग्य संयोजन करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. भारताला गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेसाठी जेतेपदाचा प्रबळ दावेदार समजले जात होते; पण साखळी फेरीतच संघ गारद झाला. या स्पर्धेदरम्यान संघाच्या कमकुवत बाजू समोर आल्या. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी भारताचा कार्यक्रम व्यस्त आहे आणि त्यामुळे मजबूत संघ तयार करण्यावर अधिक भर असणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच आयपीएल संघांचे जेतेपद मिळवले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली आता भारताला सलामी जोडी, मध्यक्रमातील फलंदाजी आणि गोलंदाज याबाबत रणनीती तयार करावी लागेल. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने विकेटकिपर फलंदाज ईशान किशनला 15 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतले.

सध्याच्या संघातील सहभागी 10 खेळाडूंना लिलावात चांगले करार मिळाले आणि सर्वांच्या नजरा श्रेयस अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स, 12 कोटी 25 लाख रुपये), हर्षल पटेल ( रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 10 कोटी 75 लाख रुपये), शार्दूल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स, 10 कोटी 75 लाख रुपये) यांच्या वर असतील. (INDIA Vs WEST INDIES)

पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या सामन्यापूर्वी भारताचा कार्यक्रम व्यस्त आहे. त्यामुळे पंतला आराम देत ईशानला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे रोहितला श्रेयस आणि सूर्यकुमार यादव दोघांनाही एकत्र अंतिम अकरा जणांच्या संघामध्ये खेळवण्याची संधी मिळू शकते. हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. यासोबत तळाला भारताकडे शार्दूल ठाकूर, दीपक चहर आणि हर्षल पटेल यांच्या रूपाने पर्याय आहेत. फिरकी विभागाची जबाबदारी पुन्हा एकदा युजवेंद्र चहलवर असेल. यासोबतच रवी बिश्‍नोईला पदार्पणाची संधी मिळते का, हे पाहावे लागेल.

आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर बिश्‍नोईला संघात स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिज संघाने भारत दौर्‍यावर येण्यापूर्वी टी-20 मालिकेत इंग्लंडला 3-2 असे नमविले होते. वेस्ट इंडिजचा फलंदाजी क्रम मोठा आहे आणि त्यांच्याकडे काही आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे ते भारताला आव्हान देऊ शकतात.

रोहितचा सहकारी कोण? (INDIA Vs WEST INDIES)

लोकेश राहुल दुखापतीमुळे बाहेर गेल्याने भारताला रोहितसोबत सलामी जोडीदार शोधावा लागेल. टी-20 मालिकेपूर्वी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने ईशानसोबत डावाची सुरुवात केली होती, तर उर्वरित दोन सामन्यांत ऋषभ पंत आणि शिखर धवन रोहितसोबत सलामीला उतरले होते. ईशानला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते; पण चांगल्या फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडचीदेखील दावेदारी मजबूत आहे. यासोबत वेंकटेश अय्यर देखील सलामीला येऊ शकतो. विराट कोहलीदेखील सलामीला येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिला टी-20 सामना

स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता
वेळ : संध्याकाळी 7 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news