

अहमदाबाद : वृत्तसंस्था, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आज गुरुवार (दि. ९) पासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज उपस्थित राहणार आहेत. नियोजनानुसार PM मोदी हे स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांचे स्वागत केले. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज हे देखील स्टेडियमवर पोहोचले आहेत.
हा निर्णायक कसोटी सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज हे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. स्टेडियमच्या बाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यासाठी मेट्रोचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
मोदी आणि अल्बनीज हे ९ रोजी सकाळी ८ च्या सुमारास स्टेडियममध्ये पोहोचतील. नियोजनानुसार PM मोदी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. सामना सुरू होण्याआधी दोन्ही पंतप्रधान संघातील खेळाडूंची भेट घेतील. स्टेडियममध्ये काही काळ सामन्याचा आनंद लुटल्यानंतर मोदी स्टेडियममधून राजभवनकडे रवाना होतील. नंतर दुपारी २ वाजता ते दिल्लीला जाणार आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. ऑस्ट्रेलियन संघ आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा सामना अनिर्णीत राहिला, तरच श्रीलंकेचा पराभव किंवा न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णीत राहणे टीम इंडियाला पुढे नेऊ शकेल.