Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, स्टीव्ह स्मिथ बाद

Ind vs Aus 3rd Test : ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, स्टीव्ह स्मिथ बाद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पहिल्‍याच दिवशी 34 षटकांमध्‍ये अवघ्‍या 109 धावांवर ऑस्‍ट्रेलियाने भारताचा पहिला डाव गुंडाळला. प्रत्युत्तरात ऑस्‍ट्रेलियाची धावसंख्या 48.5 षटकात 4 बाद 146 झाली आहे. (Ind vs Aus 3rd Test)

ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट

125 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रवींद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले आहे. ख्वाजाने 147 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याने चार चौकार मारले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली

इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी कांगारूंची धावसंख्या 110 धावांच्या पुढे नेली. दोघांनी सावध पवित्रा घेतला होता.

ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट

108 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट पडली. मार्नस लबुशेन 91 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याने ख्वाजासोबत दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. लबुशेननंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी आला.

उस्मान ख्वाजाचे अर्धशतक

उस्मान ख्वाजाने कसोटी क्रिकेटमधील 21 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 102 चेंडू आणि चार चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. यासह ऑस्ट्रेलियाची धावसंख्याही 100 च्या पुढे गेली.

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. कांगारूंची दुसरी विकेट घेण्यासाठी भारतीय गोलंदाज खूप प्रात्न करताना दिसले. पण त्यांना यश आले नाही. यावेळी ख्वाजा 33 आणि लबुशेन 16 धावांवर खेळत होते.

रवींद्र जडेजाच्या एका षटकात 2 चौकार

ऑस्ट्रेलियन फलंदाज इंदूर कसोटीत स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी झाले आहेत. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 21 वे षटक फेकले. या षटकात, उस्मान ख्वाजाने एक चौकार मारला आणि दुसरा चौकार हा बायच्या माध्यमातून आला.

लॅबुशेनला जीवदान

11 व्या षटकात अश्विनने लबुशेनविरूद्ध एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. पण पंचांनी हे अपील परतावून लावले. कर्णधार रोहित शर्मानेही डीआरएस घेतला नाही. कारण भारताने त्यापूर्वीच दोन डीआरएस घेतले होते. रीप्लेमध्ये, चेंडू स्टंपवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे एकप्रकारे लॅबुशेनला जीवदान मिळाले.

ऑस्‍ट्रेलियाचे अर्धशतक

ख्वाजा आणि लॅबुशेनची जोडी भारतासाठी धोकादायक बनली आहे. या दोघांमध्ये 50+ धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे.

दहा षटकांपर्यंत दोन डीआरएस गमावले

भारताने दहा षटकांपर्यंत दोन डीआरएस गमावले. रवींद्र जडेजाने ख्वाजाविरूद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील केले. पण पंचांनी ख्वाजा बाद नसल्याचे सांगितले. यानंतर, जडेजाने कर्णधारावर दबाव आणला आणि डीआरएस घेतला. पण चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याचे दिसले. अशाप्रकारे भारताने आपला दुसरा डीआरएस गमावला.

क्लिन बोल्ड होऊनही लॅबुशेन नाबाद

चौथ्या षटकात मार्नस लॅबुशेनला जीवदान मिळाले. रवींद्र जडेजाने त्याला क्लिन बोल्ड केले होते. पण, हा चेंडू नो-बॉल होता.

ऑस्‍ट्रेलियाला पहिला धक्‍का

दुसर्‍या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऑस्‍ट्रेलियाला पहिला धक्‍का बसला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला (9) रवींद्र जडेजाने पायचीत केले. 12 धावांवर आस्‍ट्रेलियाने पहिली विकेट गमावली आहे.

'फिरकी'च्‍या चक्रव्‍यूहात भारतीय फलंदाज, पहिला डाव १०९ धावांत गुंडाळला

तिसर्‍या कसोटीत भारताच्‍या पहिल्‍या डावाची सुरुवात अत्‍यंत खराब झाली. सहाव्‍या षटकात २७ धावांवर भारताला पहिला धक्‍का बसला. कर्णधार रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले होते. मात्र याचा तो फायदा घेवू शकला नाही. फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमन याच्‍या चेंडूवर रोहित यष्‍टीचीत झाला. त्‍याने २३ चेंडूत १२ धावा केल्‍या. यानंतर आठव्‍याच षटकात कुहमेन याने सलामीवीर शुभमन गिल याला २१ धावांवर बाद केले. यानंतर नवव्‍या षटकात नॅथन लायनने पुजाराला त्रिफळाचीत केले. ११ व्‍या षटकात रवींद्र जडेला ( ४ धावा ) आणि श्रेयस अय्‍यर ० धावांवर बाद झाले. ४५ धावांवर भारताचा निम्‍मा संघ तंबूत परतला.

एकीकडे टीम इंडिया विकेट गमावत असताना विराट कोहलीने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र २२ षटकात टॉड मर्फीने विराटला चकवा दिला. तो २२ धावांवर पायचीत झाला. त्‍याने ५२ चेंडू खेळले. आपल्‍या खेळीत विराटने २ चौकार फटकावले. यानंतर २५ व्‍या षटकात श्रीकर भरत हा १७ धावांवर बाद झाला. नॅथन लायनने त्‍याला पायचीत केले. लंचपर्यंत भारताने ८४ धाावंवर सात गडी गमावले. २९ षटकात मॅथ्‍यू कुहनेमन याने ३ धावांवर खेळणारा अश्‍विनला यष्‍टीरक्षक कॅरीकडे झेल देणे भाग पाडले. भारताने २९ षटकात ८ गडी गमावत ८८ केल्‍या.

उमेशचे सलग दोन षटकार, भारत १०० पार

एकीकडे भारताची डावाची पडझड होत असताना उमेश यादव याने दोन षटकार आणि एक चौकार फटकावत दडपण कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याच्‍या फटकेबाजीमुळे भारताने ३१ व्‍या षटकात १०० धावांचा टप्‍पा पार केला.

 Ind vs Aus 3rd Test :  मॅथ्यू कुहनेमनचे पाच बळी

झटपट धावा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात असणार्‍या उमेश यादवला मॅथ्‍यू कुहनेमन याने पायचीत केले. भारताने १०८ धावांवर नववी विकेट गमावली.उमेश यादवने १३ चेंडूत १७ धावा केल्‍या. तिसर्‍या कसोटीत पहिल्‍या डावात ऑस्‍ट्रेलियाच्‍या फिरकीपटू मॅथ्‍यू कुहनेमन याने १६ धावात पाच बळी घेतले.  एका डावात पाच बळी घेण्‍याची त्‍याची ही पहिलीच वेळ आहे.

सिराज धावचीत

अखेर मोहम्‍मद सिराज हा शून्‍य धावावर धावचीत झाला आणि भारताचा तिसर्‍या कसोटीतील पहिला डाव १०९ धावांवरच आटोपला. मायदेशात खेळताना मागील १३ वर्षांमधील भारताचा कसोटीमधील ही सर्वान निच्‍चांकी धावसंख्‍या ठरली आहे. ऑस्‍ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज मॅथ्‍यू कुहनेमन ५, नॅथन लायनने ३ तर टॉड मर्फीने एक विकेट घेतली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news