देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरु लागली! २४ तासांत रुग्णसंख्या १ लाखाच्या खाली
पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनाची रुग्णसंख्या (daily COVID19 cases) १ लाखाच्या खाली आली. २४ तासांत कोरोनाचे नवे ८३ हजार ८७६ नवे रुग्ण आढळून आले. तर ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ लाख ९९ हजार ५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात ११ लाख ८ हजार ९३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२५ टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख २ हजार ८७४ वर पोहोचला आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाचे १ लाख ७ हजार ४७४ रुग्ण आढळून आले होते. तर ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. रविवारी पॉझिटिव्हिटी रेट ७.४२ टक्के होता.
आजपासून दिल्लीतील शाळा सुरु
दरम्यान, दिल्ली सरकार तसेच दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) दिलेल्या निर्देशानुसार देशाच्या राजधानीतील शाळा आज सोमवारपासून सुरु होत आहेत. दरम्यान, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय पूर्ण क्षमतेने उघडण्याचे आदेशही डीडीएमएने दिले आहेत. त्यानुसार सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेएनयूमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. गुजरातमध्येही पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत.
केरळमध्येही कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. येथे तिसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे. यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे.
ब्रिटनमध्ये रुग्णसंख्येत घट
मलेशियामध्ये कोरोनाचे १०,०८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्येही गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

