निपाणी पोलिसांचे कोल्हापुरात स्टिंग ऑपरेशन, बनावट कोरोना चाचणी; तिघांना अटक | पुढारी

निपाणी पोलिसांचे कोल्हापुरात स्टिंग ऑपरेशन, बनावट कोरोना चाचणी; तिघांना अटक

बेळगाव/निपाणी ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआरची सक्‍ती असल्यामुळे कोरोना चाचणी न करताच बनावट आरटी-पीसीआर प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निपाणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे. बनावट प्रमाणपत्रे कोल्हापूर शहरातील नामांकित प्रयोगशाळा तसेच महाविद्यालयातून मिळवली असल्याचे भासवले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात कोल्हापुरातील सहा, सातार्‍यातील एक आणि कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे. पैकी तिघांना अटक करण्यात आली असून, आनंद ट्रॅव्हल्सची बस जप्‍त करण्यात आली आहे.

अटक केलेल्यांमध्ये आनंद ट्रॅव्हल्सचे दोन बसचालक सुरेश शिवाप्पा मडहळ्ळी (रा. विद्यानगर, हुबळी), सतीश पांडुरंग शिंदे (रा. सोनगेकरवाडी, ता. वाई, जि. सातारा) व कंडक्टर कम एजंट जगदीश दोड्डपरसापा (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) यांचा समावेश आहे. शेफाली ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक अरबाज, एजंट अन्सार, आनंद ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक, सहारा ट्रॅव्हल्स बुकिंग ऑफिस व्यवस्थापक तसेच याच ट्रॅव्हल्सचा एजंट अहंमद (सर्वजण राहणार कोल्हापूर) या सहाजणांवर निपाणी पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

कोल्हापुरातील शेफाली, आनंद व सहारा ट्रॅव्हल्सच्या या 6 जणांनी बनावट आरटी-पीसीआर देण्याचे रॅकेट चालवले असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीने चक्‍क कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खरी कॉर्नर येथील जीवन लॅबोरेटरीच्या नावे बनावट आरटी-पीसीआर प्रमाणपत्रे दिली आहेत.

सर्वत्र कोरोना नियम शिथिल झालेले असताना महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी कर्नाटकने आरटी-पीसीआर सक्‍ती कायम ठेवली आहे. याचाच फायदा खासगी बसचालक उठवत आहेत. शिवाय, कर्नाटक पोलिसांना सीमेवर लाच द्यावी लागते, असे सांगत तिकिटाच्या चारपट रक्‍कम उकळत पोलिसांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या राजकीय नेत्यांनी चर्चा करून सीमेवरील आरटी-पीसीआरची सक्‍ती रद्द करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांचे स्टिंग ऑपरेशन

कोगनोळी चेक पोस्टवर पोलिस रात्रंदिवस खासगी बसेस व वाहने तपासत आहेत. गेल्या आठवड्यात 80 पैकी 30 प्रवाशांकडे मिळालेले आरटी-पीसीआर बनावट असल्याचा संशय पोलिसांना होता. गुरुवारी सायंकाळी निपाणीचे निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांचे दोघे सहकारी साध्या वेशात कोल्हापूरला गेले. त्यांनी खासगी बसचालकांशी संपर्क साधून आपल्याला हुबळीला जायचे आहे, असे सांगितले. तेव्हा कोल्हापूर-हुबळी तिकीट प्रत्येकी 1,500 रुपये होईल, असे सांगितले.

कोल्हापूर ते हुबळी तिकिटाचा कमाल दर 500 रुपये आहे. परंतु, हे खासगी बस कंपनीचालक चक्‍क 1,500 रुपये घेत होते. त्यावर पोलिसांनी त्यांना इतके पैसे का, असे विचारले. त्यावर सांगण्यात आले की, या पैशात तुमची कोरोना चाचणी न करताच आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल दिला जाईल तसेच काही पैसे कर्नाटक पोलिसांना द्यावे लागतात.

त्यानंतर तिघा अधिकार्‍यांनी तिकिटाचे पैसे दिले आणि कोगनोळीला आरटी-पीसीआर विचारतील ना? असा प्रश्‍न बसवाहक व ट्रॅव्हल एजंटांना केला. त्यावर तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसा, तुम्हाला तिथेच आरटी-पीसीआर मिळेल, असे सांगण्यात आले आणि आश्‍चर्य म्हणजे 10 मिनिटांत कोणतीही तपासणी न करता पोलिस निरीक्षकांसह तिघांचे चक्‍क निगेटिव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्र त्यांच्या हातात आले.

प्रवासी बनून आलेल्या या अधिकार्‍यांनी त्यावेळी काहीही न बोलता बसमधून प्रवास केला. मात्र, बस कोगनोळीजवळ येताच आपले खरे रूप उघड करत दोघा बसचालकांसह तिघांना अटक केली व बस जप्‍त केली.

24 जणांकडे बनावट आरटी-पीसीआर

ज्या बसमधून पोलिस अधिकारी आले, त्या बसमधील तब्बल 24 जणांकडे बनावट आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याचे दिसून आले. ही सर्व प्रमाणपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

पोलिसप्रमुखांचे मार्गदर्शन

जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्‍त जिल्हा पोलिसप्रमुख महानिंग नंदगावी, चिकोडीचे उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्टिंग ऑपरेशन झाले. निपाणीचे पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी स्वतः यामध्ये सहभाग घेतला. ते व त्यांचे काही सहकारी बसमधून कोगनोळी नाक्यावर आले. तेथे मध्यरात्री पोलिसांनी आधीच सापळा रचला होता.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार, शहर ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर, बसवेश्‍वर चौकचे आनंद कॅरिकट्टी, खडकलाट पोलिस ठाण्याचे लक्ष्माप्पा अरी, सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. ए. तोळगी, हवालदार पोपट ऐनापुरे, शेखर असोदे, उदय कांबळे, एम. ए. तेरदाळ, रघू मेलगडे, अमर चंदनशिवे, एम. एस. नदाफ, वैशाली पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

Back to top button