

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंका विरूध्दच्या दुसऱ्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अक्षरने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. त्याने ३१ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मधूशंका आणि रजिथा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (IND vs SL)
श्रीलंकेने भारताचा १६ धावांनी पराभव केला. यासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारतासमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताला केवळ १९० धावाच करता आल्या आणि सामना गमवावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात कर्णधार दासून शनाका आणि कुशल मेंडिस यांनी श्रीलंकेसाठी अप्रतिम फलंदाजी केली. त्याचवेळी अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतासाठी शानदार कामगिरी केली. मात्र, हे दोघेही भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ७ जानेवारीला (शनिवारी) खेळवला जाणार आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या षटकात अर्शदीपने १९ धावा दिल्या आणि येथूनच श्रीलंकेच्या डावाला वेग आला. कुशल मेंडिस ३१ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला, मात्र तोपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या ८० धावा झाली होती. पुढच्याच षटकात भानुका राजपक्षेही दोन धावा काढून बाद झाला. काही वेळाने पथुम निशांकही ३३ धावा करून बाद झाला. धनंजय डिसिल्व्हा विशेष काही करू शकला नाही आणि तीन धावा करून बाद झाला. यानंतर चरित असलंकाने १९ चेंडूत ३७ धावा करत श्रीलंकेला सामन्यात आणले. यानंतर दासुन शनाकाने २२ चेंडूत ५६ धावांची खेळी करत श्रीलंकेची धावसंख्या सहा बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवली.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. भारताने डावाच्या दुसऱ्या षटकातच दोन्ही सलामीवीर बाद झाले. कसून रजिताने इशान किशनला दोन आणि शुभमन गिलला पाच धावांवर बाद केले. पदार्पणाच्या सामन्यात पाच धावा करून राहुल त्रिपाठीही बाद झाला. २१ धावांत तीन विकेट पडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला. नंतर कर्णधार हार्दिकही स्वस्तात बाद झाला. भारताच्या चार विकेट ३४ धावांवर पडल्या होत्या. सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी छोटीशी भागीदारी केली, पण हुडानेही नऊ धावाकरून बाद झाला. यानंतर अक्षर पटेलसह सूर्यकुमारने वेगवान धावा केल्या.
दरम्यान, अक्षरला धावबाद करण्याची सोपी संधी श्रीलंकेने गमावली. अक्षर आणि सूर्याने मिळून भारताची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. या दोघांनी शानदार भागीदारी करून भारताला सामन्यात पुनरागमन केले, पण शेवटी सूर्यकुमार आणि अक्षर दोघेही बाद झाले. हे दोघे बाद झाल्याने भारताचा सामना गमवावा लागला. मात्र, अखेरच्या षटकापर्यंत भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या.
हेही वाचा;