

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsBAN Test : टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. भारताच्या 404 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केवळ 8 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यजमान संघानला फॉलोऑन पासून वाचवण्यासाठी 72 धावांची गरज आहे. मात्र, बांगलादेशच्या फलंदाजांनी आतापर्यंत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता फॉलोऑनमधून त्यांची सुटका ही चमत्कारापेक्षा कमी असणार नाही.
भारतीय संघाचा पहिला डाव 404 धावांवर संपला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने डावखुरा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोला गोल्डन डकवर बाद केले. विकेटकीपर पंतने त्याचा झेल पकडला. भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्थिरावण्याची संधीच दिली नाही आणि त्यांचा डाव गडगडला. उमेशने चौथ्या षटकाच्या तिस-या चेंडूवर यासिर अलीला (4) बोल्ड केले. यानंतर सिराजने आपल्या गोलंदाजीला धार देत 13.2 आणि 17.2 व्या षटकात अनुक्रमे लिटन दास (24), झाकीर हसनला (20) तंबूत पाठवले. त्याने अक्षरश: बांगलादेशच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. यानंतर कुलदीप यादवने आपली फिरकीच्या जादूने उर्वरीत बांगलादेशी फलंदाजांना नाचवले. 22 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कुलदीपने पहिल्याच षटकात विकेटची चव चाखली. त्याने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला (3) आपला पहिला बळी बनवला. त्यानंतर नरुल हसन (16), मुशफिकर रहीम (28), तैजुल इस्लाम (0) यांना कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. खेळाच्या दुसऱ्या दिवशी भारताचा हा चायनामन गोलंदाज 10 षटकांत 33 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी घेण्यात यशस्वी झाला.
बांगलादेशला लागलेल्या पहिल्या 4 धक्क्यांपैकी सिराजने एकट्याने 3 बळी घेतले. चायनामन कुलदीप यादव आक्रमणात आल्यावर त्याने संपूर्ण सामना हायजॅक केला. 22 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कुलदीपने पहिल्याच षटकात विकेटची चव चाखली. त्याने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला आपला पहिला बळी बनवला. कुलदीपने खेळाच्या दुसऱ्या दिवशी 10 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले.
यजमान संघ फॉलोऑन खेळतो की नाही हे टीम इंडियाच्या थिंक टँकच्या निर्णयावर अवलंबून असेल. अलीकडच्या काळात, टीम इंडियाने विरोधी संघांना फॉलोऑन न देण्याची परंपरा केली आहे, परंतु चितगावच्या वेगवान खेळपट्टीवर, भारतीय कर्णधार केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ही परंपरा खंडित करू शकतात.
चितगावमध्ये दोन दिवसांच्या खेळानंतर भारत सध्या ज्या टप्प्यावर पोहोचला आहे, तिथून तो फक्त आणि फक्त विजयच मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशला भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय नोंदवण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार हेही यावरून स्पष्ट झाले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र वगळता उर्वरित 5 सत्रांमध्ये भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात बांगलादेशवर वर्चस्व राखले.