IND vs AUS T20 : पराभवासाठी ‘दव’ जबाबदार! ऋतुराज गायकवाडकडून गोलंदाजांची पाठराखण

IND vs AUS T20 :  पराभवासाठी ‘दव’ जबाबदार! ऋतुराज गायकवाडकडून गोलंदाजांची पाठराखण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 222 धावा करूनही सामना गमावला. गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (नाबाद 123) शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे लक्ष्य दिले मात्र, एवढे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर 5 गडी गमावून पूर्ण केले. यादरम्यान ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. त्याच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर कांगारूंना हा सामना जिंकण्यात यश आले.

ऋतुराजचे शतक व्यर्थ

शेवटच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 43 धावांची गरज होती. ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार मॅथ्यू वेड यांनी मिळून ऑस्ट्रेलियाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. अक्षर पटेलने 19व्या षटकात 22 धावा दिल्या तर प्रसिद्ध कृष्णाने 20व्या षटकात 23 खर्च करून ऑस्ट्रेलियाला विजयाची भेट दिली. टीम इंडियाच्या या पराभवामुळे ऋतुराजचे शतक व्यर्थ गेले. असे असूनही सामन्यानंतर त्याने गोलंदाजांचा बचाव केला.

'डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाज महागडे ठरले' (IND vs AUS T20)

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ऋतुराज गायकवाड म्हणाला की, आउटफिल्ड इतके ओले झाले होते की चेंडू पकडणे कठीण झाले होते. यामुळेच डेथ ओव्हर्समध्ये आमचे गोलंदाज महागडे ठरले. मैदानावर दव पडल्याने कोणतेही लक्ष्य त्यांच्यासाठी अवघड नव्हते', असे स्पष्टीकरण दिले. यावेळी त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीचेही कौतुक केले. 3 षटकात 50 धावा आवश्यक असताना त्याने आपल्या संघाला सामना जिंकून दिला, त्याची खेळी जिगरबाज ठरल्याचेही तो म्हणाला.

'ओल्या बॉलने गोलंदाजी…' (IND vs AUS T20)

गायकवाड पुढे म्हणाला की, 'मला वाटत नाही की ही चिंतेची बाब आहे. ओल्या बॉलने आपण गोलंदाजी करतोय असे वाटत होते. अशी परिस्थिती गोलंदाजांसाठी खूप कठीण असते. त्यामुळे प्रत्येक षटकात 12, 13 किंवा 14 धावाही होऊ शकतात. मात्र ही चिंतेची बाब नाही. परिस्थिती कठीण होती आणि आम्हाला ती स्वीकारून पुढे जावे लागेल.'

चौथा टी-20 सामना रायपूरमध्ये (IND vs AUS T20)

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसरा टी-20 सामना 5 गडी राखून जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत स्वतःला जिवंत ठेवले आहे. मालिका आता 2-1 अशा अवस्थेत पोहचली असून अजून दोन सामने शिल्लक आहेत. मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी रायपूरमध्ये खेळवला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news