

लखनौ, पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या निकटवर्तींय नेत्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापे टाकले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना झालेल्जाया कारवाईने राजकीय वातावरण तापले आहे.
आयकर विभागाने लखनौ, मैनपुरी, आग्रा येथे छापे टाकले आहेत. यात गजेंद्र सिंग यांच्यासह १२ जणांच्या घरी तपासणी सुरू आहेत. लखनौ येथे आयकर विभागाने आंबेडकर पार्क येथील गजेंद्र सिंग यांच्या घरी छापा पडला आहे. सिंग हे अखिलेश मुख्यमंत्री असताना ओएसडी होते.
आयकर विभागाने कारवाई केलेल्या १२ जणांमध्ये ३ मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये महू येथील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय, लखनौ येथील जैनेंद्र यादव, मैनपुरी येथील मनोज यादव यांच्या घरात सध्या तपास सुरू आहे. हे तीनही नेते अखिलेश यादव यांच्या जवळचे मानले जातात.
सर्वात आधी राजीव राय यांच्या मऊ येथील सहादतपुरा येथील घरावर शनिवारी सकाळी ७ वाजता छापा टाकला. राय हे २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढले आहेत. राय यांची दुबई आणि बंगळूर येथे मेडिकल कॉलेज आहेत. छापा पडल्याचे समजताच राय यांचे समर्थक मोठ्या संख्येने घराबाहेर जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राय हे समाजवादी पक्षातील बडे नेते समजले जातात.
शेतकरी नेता अशी त्यांची ओळख आहे. महू, बलिया आणि गाजीपूर परिसरातील शेतकऱ्यांचे ते नेतृत्व करतात. सध्या विधानसभा निवडणुकीत घोसी मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ते बलिया येथून मऊ येथे रहायला आले असून त्यांनी तेथे घर घेतले आहे. शिवाय कार्यालयही सुरू केले आहे.
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना ओएसडी असलेले जैनेंद्र यादव लखनौ येथील गोमतीनगर येथे राहतात. सध्या ते रिअल इस्टेटचा व्यवसाय करत असून लखनौबरोबरच अन्य शहरांत त्यांची जमीन आहे. त्याबरोबरच त्यांची मिनरल वॉटर कंपनीही आहे.मैनपुरी परिसरातील मनोज यादव हे आरसीएल ग्रुपचे चेअरमन असून ते गेली अनेक वर्षे मैनपुरीचे बडे नेते आहे. जिल्हा परिषदेसह अन्य ठिकाणी सपाची सत्ता आहे. मनोज यादव हे अखिलेश यांच्या कोअर टीमचे सदस्य मानले जातात.
हेही वाचलं का?