डॉ. भोजराज यांचे ‘पाठीचा कणा कसा सांभाळाल?’ विषयावर आज व्याख्यान | पुढारी

डॉ. भोजराज यांचे ‘पाठीचा कणा कसा सांभाळाल?’ विषयावर आज व्याख्यान

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाठीचा कणा कसा सांभाळाल’ या विषयावर जगविख्यात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 18) सायंकाळी 5 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होत आहे.

‘डॉक्टर्स डे’निमित्त दरवर्षी दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने गेली 18 वर्षे अविरतपणे व्याख्यानमाला सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांनी या व्याख्यनमालेतून दिलेला आरोग्य मंत्र लाखो लोकांसाठी आरोग्य संजीवनी ठरत आहे. यासोबतच आरोग्य शिबिरे व ध्यानमय योगासने शिबिर सुरू आहेत. बदलत्या जीवन शैलीमुळे नोकरदारांना मोबाईलचा, संगणकाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. धावपळीच्या जीवनात अवेळी जेवण, असंतुलित आहार याचाही परिणाम शरीरावर होत आहे. अलिकडे तर कोणत्याही वयात मान, पाठदुखीच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. हीच गरज ओळखून यावर्षी व्याख्यानमालेसाठी मान व पाठदुखीबाबत मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

मणक्यातील विविध गाठी, पायांना आलेले अंपगत्व, मुलांचे वेडेवाकडे मनके, कमरेची गादी सरकणे अशा समस्या सोडविण्यासाठी ओळखले जाणारे डॉ. शेखर भोजराज हे या व्याखानाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. भोजराज यांनी मुंबईतील व्ही. एन. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रियादेखील डॉ. भोजराज यांनी यशस्वी केली आहे.

शंकांचे जागीच होणार निरसन….

शनिवारी होणार्‍या व्याख्यानात उठण्याच्या-बसण्याच्या योग्य पद्धती, मोबाईल वापरावेळी घ्यावयाची काळजी, आहार-विहार, मणक्याला होणार्‍या इजा टाळण्यासाठीचे उपाय, तसेच पाठदुखी, मानदुखीवरील प्रतिबंधत्माक उपाय याची माहिती मिळणार आहे. श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही करणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन अग्रक्रमाने सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

डॉ. भोजराज यांचा परिचय

डॉ. शेखर भोजराज एम. एस. ऑर्थो, एफ. सी. पी. एस. डी. ऑर्थो आहेत. ते असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जनस् ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे अध्यक्ष आहेत. स्पाईन फाऊंडेशनच्या माध्यमातून तरुण ऑर्थोपेडिक सर्जन्सना स्पाईन सर्जरीच्या क्षेत्रात प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते. डॉ. भोजराज सध्या व्ही. एन. देसाई म्युनिसिपल हॉस्पिटल, मुंबई, लीलावती हॉस्पिटल मुंबई, ब—ीच कँडी हॉस्पिटल मुंबई, वोकार्ड हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शोधप्रबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते भारतातील पहिले पूर्णवेळ कौशल्यपूर्ण स्पाईन सर्जन आहेत.

  • व्याख्यानमालेचे सलग 18 वे वर्षे
  • दिग्गज वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाखोंना फायदा
  • सहभागी प्रेक्षकांच्या शंकांचे थेट निरसन
  • मान, पाठदुखी, मनक्याच्या प्रत्येक समस्येचे मिळणार उत्तर

Back to top button