

कोल्हापूर; संतोष पाटील : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( kolhapur district bank election ) सर्वसमावेशक पॅनेलची घोषणा करण्यापूर्वी उर्वरित गटांतील नऊ जागांचा तिढा कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे चार आणि तीन अशा नऊपैकी सात जागा मागील वेळी होत्या. बदलत्या राजकारणात मोहरे इकडचे तिकडे झाले, तरी संचालकांचे संख्याबळ कायम राहावे, यासाठी दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा तिढा सोडवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीपुढील नवे आव्हान आहे. लांबचे राजकारण करायचे की आताचे सत्ताकारण पाहायचे, असा पेच नेत्यांपुढे आहे.
मागील वेळी 21 पैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीत ( kolhapur district bank election ) 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत शेतकरी शाहू विकास आघाडीने एक हाती सत्ता आणली. राष्ट्रवादी आठ जागा, काँग्रेस सहा, शिवसेना आणि जनसुराज्य प्रत्येकी एक, तर अपक्ष दोन आणि भाजप-सेना आघाडी एका जागेवर विजयी झाले होते. उर्वरित नऊ जागावाटपात काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. आता बदलत्या राजकारणात आवाडे गट भाजप आघाडीसोबत आहे. आ. प्रकाश आवाडे यांनी बँका-पतसंस्था या जनसुराज्य पक्षाकडील तसेच संस्था प्रक्रिया या राष्ट्रवादीतून उमेदवारी मागणी केली आहे. दोन्हीपैकी एका जागेवर आवाडे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. गतवेळी राष्ट्रवादीकडून महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने संचालक झाल्या. आता त्या शिवसेनेत आहेत. प्रक्रिया गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आणि इतर शेती संस्था गटातून भैया माने अशा तीन जागा राष्ट्रवादीच्या होत्या. आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला आ. कोरे यांचा विरोध आहे. शाहूवाडी संस्था गट बिनविरोध करण्याचे ठरल्यास ओबीसीतून सर्जेराव पाटील-पेरिडकर यांचा विचार करावा लागेल. खा. संजय मंडलिक प्रकिया गटातून बिनविरोध निवडून आले होते. आता निवेदिता माने यांची महिला गटातील जागेसह शिवसेनेला दोन जागा देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, आ. प्रकाश आबिटकर आणि माजी आ. चंद्रदीप नरके प्रत्येकी एका जागेवर ठाम आहेत. हा पेच सोडवताना दोन्ही काँग्रेसचे धोरण महत्त्वाचे ठरणार आहे.