पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धर्म, जातपात व प्रांतवादाच्या नावावर देशाला तोडण्याचे काम केले जात आहे. देशविघातकांच्या या कृतीला विरोध करताना एकसंध भारतासाठी आजच्या युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी केले. प्रभू रामचंद्रांची ही भूमी असल्याने महोत्सवासाठी नाशिकची निवड केली. तीन वर्षांनी नाशिकला कुंभमेळा भरणार असून, तत्पूर्वी आज या तपोभूमीत युवा कुंभमेळा भरल्याचे कौतुकोद‌्गार त्यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) पंचवटीमधील तपोवन मैदान येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद‌्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्ताने मंत्री ठाकूर बोलत होते. ते म्हणाले, युवादिनाचे औचित्य साधत देशातील ८०० जिल्ह्यांमध्ये २० हजार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांच्या माध्यमातून आज देशाला एकत्रित बांधण्याचा हा प्रयत्न आहे. पूर्वी जातीयवाद व प्रांतवाद निर्माण करत देशाची विभागणी करण्यात येत होती. आजही काही प्रमाणात असा प्रयत्न केला जातोय. परंतु जातपात, धर्म व प्रांतापेक्षा देश कधीही मोठा आहे, अशी भावना युवकांनी अंगीकारली पाहिजे. याच भावनेमधून सशक्त व सुदृढ भारताची निर्मिती होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.

देशामध्ये २०१४ पूर्वी २-जी घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसारखे विविध घोटाळे एेकायला मिळत होते. पण मागील १० वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने मोठी प्रगती केली आहे. आत्मनिर्भर भारताची घाेडदौड वेगाने सुरू आहे. 'चांद्रयान मोहीम', 'आदित्य एल-१' यांसारखे यशस्वी प्रयोग देशाने करून दाखविले आहे. जगभरात भारतीय खेळाडूंचा डंका पाहायला मिळतो आहे. शंभर पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंचा भारतीयांना सार्थ अभिमान असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली. येत्या काळात देशात आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यानिमित्ताने केली.

युवकांनी फिटनेस जपावा

युवा ही भारताची शक्ती आहे. या युवकांच्या बळावर गेल्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था जगात टॉप पाच मध्ये आली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर हीच अर्थव्यवस्था टॉप थ्रीमध्ये आणायचा मानस मंत्री ठाकूर यांनी बोलून दाखविला. २०४७ लक्ष ठेवत नवभारताचे स्वप्न मोदी यांनी पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता युवकांमध्ये आहे. युवकांनी दररोज तीन तास स्वत:साठी काढताना फिटनेस जपावा, असा सल्लाही ठाकूर यांनी उपस्थित युवकांना दिला.

नाशिक प्रेरणाभूमी

प्रभू श्री रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने नाशिक पावन झाले आहे. या भूमीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर देशाला दिले. महोत्सवानिमित्ताने देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोन प्रेरणास्रोत लाभल्याचे उद‌्गार मंत्री ठाकूर यांनी काढले. काशी व केदारनाथाच्या विकासानंतर आता आयोध्या धाम पूर्णत्वास येत असल्याचा आनंद आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसवर निशाणा

मंत्री ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांचे पंतप्रधान १० रेसकोर्समधून बाहेर पडत नव्हते. मात्र, मोदी यांनी देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर निवासस्थानाचे नाव बदलून लोककल्याण मार्ग केले. तसेच इंग्रजांची आठवण सांगणारी अनेक नावे बदलली गेली. राजपथाचे नाव बदलून ‌'कर्तव्यपथ' केल्याचे सांगताना ठाकूर यांनी या मार्गावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारल्याची आठवण करून दिली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news