लष्कर-ए-तोयबाचा खरा सूत्रधार भुट्टावीच होता | पुढारी

लष्कर-ए-तोयबाचा खरा सूत्रधार भुट्टावीच होता

कराची, वृत्तसंस्था : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा एक संस्थापक असलेल्या हाफीज अब्दुल सलाम भुट्टावी याचा 9 महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाल्याच्या वृत्ताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दुजोरा दिला आहे. हाफीज सईद लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख असला, तरी घातपाती कट आखणे, त्याचे नियोजन करणे, अर्थसाहाय्य उभे करणे आदी सारी महत्त्वाची कामे भुट्टावी हाताळत असे.

गतवर्षी 29 मे रोजी पाकिस्तानच्या मुरिदके येथील तुरुंगात असलेल्या भुट्टावीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता; पण आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केले आहे.

‘लष्कर’मधील नंबर 2

70 वर्षीय भुट्टावी हा हाफीज सईदचा उजवा हात होता. लष्कर-ए-तोयबाच्या संस्थापकांमधील तो एक होता. लष्कर-ए-तोयबाच्या मुरिदके येथील मुख्य कार्यालयात बसून तो संघटनेची सारी सूत्रे हलवत असे. अल-कायदाशी त्याचे जवळचे संबंध होते. लष्कर-ए-तोयबाच्या सार्‍या घातपाती कारवाया त्याच्या मंजुरीशिवाय हाती घेतल्याच जात नसत. कटांची आखणी, नियोजन, आर्थिक पुरवठा आदी सार्‍या बाबी तो सांभाळत असे. हाफीज सईद कैदेत गेल्यावर लष्कर-ए-तोयबाची सारी सूत्रे त्याच्याकडे असत.

मुंबई हल्ल्यात सहभाग

2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाने मुंबईवर हल्ला केला. 26/11 च्या या हल्ल्यात 150 हून अधिक जण मरण पावले होते. या हल्ल्याचा मास्टरमाईंड जरी हाफीज सईद असला, तरी सारे नियोजन आणि कोणत्या ठिकाणी काय करायचे, याचेही नियोजन त्याने केले होते. मुंबई हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांना मानसिकरीत्या तयार करण्यासाठी व त्यांना शहादतचे महत्त्व पटवून देण्यासाठी भुट्टावीने त्यांचे खास वर्ग घेतले होते. या सर्वांचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करून त्यांना भारतात पाठवण्यात आले होते.

Back to top button