

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma INDvsNZ : विश्वचषकात आज (दि. 22) रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. जिथे रोहित सेनेने सर्व सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध भारताची ही विजयी मालिका कायम राहिल का? याकडे सर्वांच्य नजरा लागल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा धमाकेदार फलंदाजी करत आहे. टीम इंडियाच्या उत्कृष्ट कामगिरी मागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. आतापर्यंत हिटमॅनने 66.25 च्या सरासरीने एकूण 265 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी तो आणखी एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहचला असून आहे. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा एकदा मोठा विक्रम रचण्याची मोठी संधी आहे. यासाठी रोहितला मोठी खेळी खेळावी लागणार आहे. (Rohit Sharma IND vs NZ)
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनला आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवायचा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 17907 धावा केल्या आहेत. या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने 93 किंवा त्याहून अधिक धावांची इनिंग खेळली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 18000 धावांचा टप्पा पूर्ण करेल. याचबरोबर तो अशी कामगिरी करणारा 20 वा फलंदाज ठरणार आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 455 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 43.35 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 45 शतके आणि 98 अर्धशतके झळकली आहेत.
एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माचे रेकॉर्ड अतिशय उत्कृष्ट आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषकाच्या 21 सामन्यांमध्ये 65.42 च्या सरासरीने आणि 102.55 च्या स्ट्राईक रेटने एकूण 1289 धावा जमा केल्या आहेत. त्याने या काळात 7 शतके आणि 4 अर्धशतके फटकावली आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत रोहितला रोखणे न्यूझीलंडसाठी सोपे नसेल. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी टूर्नामेंटमधील रेकॉर्ड सुधारायचे असेल तर कर्णधार रोहितने आपला फॉर्म पुढे कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.