

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी मानांकन दिले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेत फिरकी खेळपट्टी चर्चेचा मुद्दा ठरली आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन संघाने बराच गदारोळ केला होता, पण आयसीसी मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही सामन्यांच्या खेळपट्ट्या सरासरी असल्याचं म्हटलं आहे. (IND vs AUS Test)
खेळपट्टी अधिक चांगली होऊ शकली असती, पण त्यात गैर काहीच नाही. जर खेळपट्टी खराब किंवा अयोग्य असती तर यजमान देशाला त्याचे उत्तर द्यावे असते व त्यांच्यावर आयसीसीमार्फत कारवाई झाली असती. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ दोन दिवस खेळला आणि सामन्यात भारतापेक्षा पुढे होता, मात्र तिसऱ्या दिवशी कांगारू संघ त्यांच्या दुसऱ्या डावात 113 धावांवर गारद झाला आणि हा सामना भारताने सहज जिंकला. (IND vs AUS Test)
नागपूरच्या खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियन संघाने चांगलाच गोंधळ घातला. त्यांचे स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचे बारकाईने निरीक्षण करताना दिसले होते. खेळपट्टीच्या निवडक भागांवर पाणी टाकल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर आली होती. ऑस्ट्रेलियन संघात डावखुरे फलंदाज असल्याने डावखुऱ्या फलंदाजांना कोरडेपणाचा सामना करावा लागतो आणि फिरकी गोलंदाजांना सुरुवातीपासूनच त्रास होतो. असा ऑस्ट्रेलियाचा आरोप होता.
भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीचा चांगला उपयोग करता आला. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व राखल्याने दोन्ही सामने तीन दिवसांत संपले. जडेजा आणि अक्षर पटेल यां जोडीसमोर फलंदाजी करणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण ठरले.
या दौऱ्यातील तिसरी कसोटी 1 मार्चपासून इंदौरमध्ये होणार आहे. तर शेवटची कसोटी 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना १७ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. दुसरा सामना 19 मार्चपासून विझाग येथे तर तिसरा सामना 22 मार्चपासून चेन्नई येथे होणार आहे.
हेही वाचा;