

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (रविवार) उघडकीस आली आहे. मंगेश परशुराम खंदारे (वय 23) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील मंगेश खंदारे यांचा विवाह सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर त्यांना मुलबाळ नव्हते. मे महिन्यात त्यांची पत्नी माहेरी गेली होती. मात्र त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत. त्यामुळे मंगेश हे तनावात होते. दरम्यान, शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मंगेश शेतामध्ये झोपण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी शेतातच गळफास घेतला.
आज (रविवार) सकाळी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र समोरून प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी शेतात येऊन पाहिले असता मंगेश यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी या प्रकाराची माहिती तातडीने पुसेगाव येथे त्याचे वडिल परशुराम खंदारे यांना सांगितली. त्यानंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले.
या घटनेची माहिती नरसी नामदेव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील गिरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोटे, जी.बी. राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी परशुराम खंदारे यांच्या माहितीवरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.