

मुलांमधलं नैराश्य, अपयशातून केली जाणारी आत्महत्या, त्यांच्या वर्तनातील दोष यामागे काही मानसशास्त्रीय कारणं असतात. ती समजून घेणे आणि या गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्नशील राहणे आपल्या हातात आहे. ( Children's Mental health )
मुलांच्या वर्तनात अनेकदा छोटे-मोठे बदल घडत असतात आणि अनेकदा ते दिसूनही येत असतात, पण त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते हे आपल्यापैकी बहुतेकांनी अजून पुरेसे जाणलेले नाही. हल्ली मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या बर्याच गाजतात. पण त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आपण कमी पडतो. असे वारंवार दिसून आले आहे की, आत्महत्या करणार्या मुलांमध्ये अनेक वेळा उदासीनता, उन्माद, छिन्नमनस्कता, फीट्स येणे यांसारखे आजार असू शकतात. परंतु मानसिक आजारांबद्दल आपल्याकडे पुरेशी जागृती नसल्यामुळे याकडे लक्ष दिले जात नाही. या मुलांचा बुद्ध्यांक नॉर्मल असल्याचे आढळून येते. तरीही ही मुले अभ्यासामध्ये पाठीमागे का पडतात, हा प्रश्न त्यांच्या पालकांना भेडसावतो; पण अनेकदा प्रश्नाच्या मुळाशी जाण्याबाबत जेवढं दाखवायला हवं तितकं गांभीर्य याबाबतीत दाखवले जात नाही.
खरंतर या आत्महत्या टाळता येऊ शकतात; परंतु त्यासाठी पालकांनी काही गोष्टी आवर्जून समजावून घ्यायला हव्यात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौगंडावस्थेमधील मुलांच्या वर्तणुकीतील बदल पालकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतले पाहिजेत. त्यांना सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पावले चुकीच्या दिशेने पडत आहेत असे वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष मुळीच करू नये. त्यातून प्रश्न हाताबाहेर जाण्याचीच जास्त शक्यता असते.
सामान्यत: अभ्यास व निरीक्षणांमधून असे स्पष्ट झाले आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी या मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, अभ्यासावर लक्ष केंद्रित न करू शकणे, कशातच रस नसणे, उदास वाटणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. आत्महत्येचा विचार बोलून दाखविणे किंवा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न यांकडे दुर्लक्ष करू नये. नंतर दु:ख करण्यात अर्थ नाही. म्हणून वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
शारीरिक आजाराच्या जशा तपासण्या आहेत, तशाच तपासण्या मानसिक आजारांतदेखील आहेत. यातून चिडचिडेपणा, एकलकोंडेपणा, अभ्यासावर लक्ष केंद्रित न करू शकणे, कशातच रस नसणे, उदास वाटणे अशा लक्षणांची चाचपणी करता येते व उपचारांची दिशा ठरवता येते. या चाचण्या पुढीलप्रमाणे असतात…
चाइल्ड बिहेविअर चेकलिस्ट : यामध्ये मुलाच्या वागण्यातील दोष लक्षात येतात.
प्रोजेक्टिव्ह टेस्ट: चित्रावरून गोष्लट बनविणे. या तपासणीमधून आपल्याला मुलांच्या अंतरंगात काय चालू आहे याचा ठाव लागू शकतो.
मिनेसोटा मल्टिफॅसिक पर्सनॅलिटी इन्व्हेन्ट्री (एमएमपीआय) स्वभाव तपासणी – या तपासणीमधून मुलांच्या स्वभावातील गुणदोष लवकर ओळखता येऊन त्यात योग्य ते बदल करण्याचा सल्ला देता येतो. या व अशा तपासण्यांमधून आजाराचे निदान झाल्यानंतर उपचारांसाठी योग्य ती दिशा मिळते. मानसिक आजारांबाबत औषधोपचार, समुपदेशन व सायकोथेरपी असे उपचार प्रभावी ठरतात. काही मानसिक आजारांमध्ये औषधे घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हल्ली कमीत कमी साइड इफेक्टस् असलेली औषधे उपलब्ध आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली ती घेतली जावीत.
मानवी मनामधील आनंद-दु:ख, राग, भीती, संशय या सर्व भावना आणि विविध मानसिक आजार हे मेंदूमधील रासायनिक बदलांवर अवलंबून आहेत, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे हे झालेले बदल पूर्ववत करण्यासाठी औषधोपचार करणे गरजेचे आहे हे रुग्णाला समजावून सांगितले गेले पाहिजे आणि तो/ती औषधोपचार व्यवस्थित घेईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मानसिक आजारांसाठी समुपदेशकांची मदत उपयोगी पडू शकते. प्रशिक्षित व अनुभवी समुपदेशक योग्य ते मार्गदर्शन याद़ृष्टीने करू शकतात. कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, शिथिलीकरण उपचार, व्होकेशनल थेरपी अशा विविध उपचारपद्धतींचा अंतर्भाव सायकोथेरपीमध्ये होतो. अशा उपचार पद्धतींचा चांगला परिणाम होऊन रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.
औदासीन्य, अपयशाची भीती, नैराश्य, आत्महत्येचे विचार यावर मात करणे याद्वारे शक्य होऊ शकते. आपली पुढची पिढी मानसिकद़ृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या विचार व वर्तनाकडे लक्ष ठेवणे आणि जेव्हा आपल्या मुलाबाळांना आपल्या आधाराची, मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा ती डोळे उघडे ठेवून देणे हे गरजेचे आहे, हे आपण सुज्ञ पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
हेही वाचा :