

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण घरात नेहमी चकोल्या करतो. याला 'वरणफळ'देखील म्हणतात. काहींना वरणातील चकोल्या (Chakolya Recepi ) आवडतात. तर काहींना चिखट आमटीतील आवडतात. आज आपण फोडणीच्या झणझणीत चकोल्या पाहणार आहोत. यामध्ये लाल तिखट असल्यामुळे झणझणीत चकोल्या चाखायला मिळतील. पण, तुम्ही फार तिखट खात नसाल तर लाल तिखटाचे प्रमाण कमी ठेवू शकता, ज्यामुळे लहान मुलांनादेखील या टेस्टी पदार्थाची चव चाखता येईल. (Chakolya Recepi )
गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ, पाणी
गरम तेल २ छोटे चमटे
१ वाटी तूर डाळ
मोहरी – अर्धा चमचा
जिरे – अर्धा चमचा
हिंग- चिमुटभर
कडीपत्ता – ५-६ पाने
लसूण – पाच पाकळ्या
थोडी साखर किंवा गूळ,
लाल तिखट, हळद,
चिंच किंवा आमसूल
कोथिंबीर बारीक चिरून
१) गहू पीठ घेऊन त्यात थोडे मीठ आणि गरम तेल घालून कणिक मऊ मळून घ्या.
२) दुसरीकडे तूरडाळ कूकरमध्ये चांगली शिजवून घ्या.
३) कणिकाचे गोळे करून चपाटी जरा जाडसर लाटून घ्या.
४) चिरणं किंवा चाकूने लाटलेल्या चपातीचे छोटो-छोटे चौकोनी काप करून घ्या.
५) शिजवलेली तूर डाळ घोटून घ्या. त्यात हिंग, मीठ, तूप, थोडी साखर, लाल तिखट, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर घालू शकता. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
६) आता एका पसरट कढईत तेल चांगले गरम करून घ्या. त्यात मोहरी, जिरे घाला. नंतर लसुण घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. लसूण लाल झाला की, त्यात कडीपत्ता घाला. वरून तूरडाळीचे मिश्रण तेलात फोडणी टाकावी. डाळ घट्ट झाल्यास त्यात पाणी घाला आणि आमटी पातळ करा.
७) आमटीमध्ये चिंच किंवा आमसूल घालू शकता. वरून चिरलेली कोथिंबीर टाका. आमटीला उकळ येऊ द्या.
८) आमटीला उकळ आल्यानंतर त्यामध्ये लाटलेल्या चपातीचे काप एक एक करून सोडा. पाच ते सात मिनिटे हे काप आमटीमध्ये शिजवा. चकोल्या शिजल्या की नाहीत, हे तुम्ही पाहू शकता.
चकोल्या शिजल्या असतील तर गॅस बंद करा आणि वाटीमध्ये गरमागरम खायला घ्या. तुम्ही यामध्ये थोडे तूपदेखील टाकू शकता.