

पुढारी ऑनलाईन : अद्याप मान्सूनने संपूर्ण भारत व्यापलेला नाही. आत्तापर्यंत मान्सूनने भारताचा ९९ टक्के भाग व्यापला आहे. दरम्यान पुढच्या काही तासांत मान्सून संपूर्ण भारत व्यापेल असा अंदाज आहे. मान्सून देशभरातील बहुतांश भागात सक्रिय झाला आहे. त्यामुळे २ जुलैपासून दक्षिण भारतातील द्विपकल्पीय प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy Rainfall Alert) आहे, अशी माहिती आयएमडी पुणे विभागाचे प्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
डॉ. के. एस होसाळीकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, रविवारी २ जुलैपासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून (३० जून) मंगळवारपर्यंत (४ जुलै) देशभरातील विविध भागात ऑरेंज, यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rainfall Alert) आएमडीकडून देण्यात आला आहे.
रविवारी २ जुलैपासून दक्षिण भारत आणि संलग्न भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचा प्रभाग महाराष्ट्रावरदेखील पडणार आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम घाटावर होणार असून, येत्या पाच दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असे आयएमडी पुणे विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.