

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका ६ वर्षांच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर त्याच्यावर उपचार करणारे उपचार करणारे डॉक्टर चांगले भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. या मुलास कॅन्सर झाल्याच्या निदानानंतर डॉ. सुधीर कुमार या डॉक्टरांनी ट्विटरवर पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली. मनू नाव असलेल्या या लहान मुलाच्या बाबतीतची माहिती वाचल्यानंतर डोळे पाणावतील अशी ही घटना आहे. मनूला मेंदूच्या डाव्या बाजुला ग्लिओब्लास्टोमा मल्टीफॉर्म कॅन्सर ग्रेड ४ चे निदान झाले आहे. डॉ. सुधीर कुमार (Neurologist) हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. (Little Boy Cancer)
मनुसोबत डॉक्टरांनी साधलेला संवाद ट्विटरवर पोस्ट केला आहे. जी गोष्ट समजायला नको होती, नेमकी तीच गोष्ट मनुला समजली. मनुला जेव्हा कॅन्सर झाल्याचे समजते तेव्हा तो डॉक्टरांना म्हणाला की, "डॉक्टर, मला ग्रेड ४ चा कॅन्सर झाला आहे. डॉ, मी आयपॅडवर या आजाराबद्दल सर्व वाचले आणि मला माहिती आहे की, मी फक्त ६ महिनेच जगेन, माझ्या आई-बाबांना याबद्दल सांगू नका." ट्विटरच्या पोस्टची सुरुवातच या मजकुरापासून होते. अवघ्या ६ वर्षांच्या मनुचे हे बोल ऐकल्यानंतर डॉ. कुमारही थक्क झाले. (Little Boy Cancer)
मात्र, दुसरीकडे डॉक्टरांना मनुचे पालक भेटल्यावर त्यांनी देखील त्याच्या काळजीपोटी डॉक्टरांना एक विनंती केली. यावेळी पालक म्हणाले की, "डॉक्टर, मनुला भेटा आणि तुमच्या उपचारांनी तो बरा होईल असा सल्ला द्या, पण कृपया त्याच्या आजाराविषयी त्याला सांगू नका." डॉ. कुमार यांनी मनूच्या पालकांना त्याच्या स्थितीबद्दल सांगितले आणि मनु सोबत झालेल्या संवाद बद्दल सांगितले.
मनुच्या पालकांना अश्रू अनावर झाले, पण तरीही त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या धिराबद्दल आभार मानले आणि जड अंतःकरणाने ते ओपीडीतून निघून गेले. डॉ. कुमार पुढे म्हणाले की, "मी ही घटना जवळजवळ विसरलो होतो, जेव्हा ९ महिन्यांनंतर मनुचे पालक मला भेटायला परत आले. तेव्हा मी त्यांना लगेच ओळखले आणि मनूच्या तब्येतीची चौकशी केली."
यावेळी पालकांनी डॉ. कुमार यांचे आभार मानले. ते म्हणाले की, "डॉक्टर, आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर मनूसोबत आम्ही खूप छान वेळ घालवला. त्याला डिज्नीलँडला भेट द्यायची होती आणि आम्ही त्याच्यासोबत गेलो. आम्ही कामातून वेळ काढला आणि मनूसोबत चांगला वेळ घालवला. महिनाभरापूर्वी आम्ही मनुला गमावले. आजची तुमची भेट ही तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी आहे, कारण तुम्ही दिलेला सल्ला आणि धीर, यामुळे आम्हाला मनुसोबतचे सर्वोत्कृष्ट ८ महिने घालवता आले याबद्दल आपले आभार मानावे तितके कमी आहेत.
डॉक्टरांनी मनु आणि त्याच्या पालकांबाबतची सांगितेली ही घटना खूपच भावुक करणारी ठरली. ट्विटरवर या मनू बाबतची घटना वाचून अनेक युजर्स देखील भावुक प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा