

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी काजोल पंजाबी मुंडा अजय देवगनच्या प्रेमात कशी पडली. तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही की, काजोल ही सुरुवातीला अजय देवगनला तुसडा समजायची. मग दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? काजोल ही मराठी अभिनेत्री तनुश्री यांची मुलगी आहे. अभिनेत्री तनुजा यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. एकेकाळी अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. (Happy Birthday kajol ) आईच्या पावलावर पाऊल ठेवून काजोल देखील सिनेसृष्टीत आली. तिनेही इथे आपले स्थान बळकट केले. अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण काजोलप्रमाणे तिची बहिण तनिषा मुखर्जी हिला तितकी लोकप्रियता मिळवता आली नाही, जितकी काजोलने मिळवलीय. (Happy Birthday kajol )
काजोलचे शिक्षण बोर्डींग स्कूल सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, पाचगणीमध्ये झाले. ती डान्स आणि इतर उपक्रमांमध्येही भाग घ्यायची. वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपट बेखुदीमध्ये ती दिसली. शालेय शिक्षणानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला.
काजोलची लव्ह स्टोरी एका चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. असे म्हटले जाते की, काजोलच्या आधी अजय देवगनचे करिश्मा कपूरशी अफेअर होते. करिश्मा कपूर त्यावेळची टॉपची अभिनेत्री होती. अजय देवगन आणि करिश्मा कपूरने पहिल्यांदा एकत्र 'जिगर' या चित्रपटात काम केले होते. कामाच्यावेळी दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अजय देवगनने करिश्मासाठी त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड रवीना टंडनशी ब्रेकअप घेतला होता. अजय देवगन-करिश्मा रिअल लाईफमध्ये टाईम स्पेंड करत होते, त्यावेळी दोघांनी एकत्र 'जिगर', 'धनवान', 'सरगम', सुहाग' यासारखे चित्रपट एकत्र केले. याचदरम्यान, अजय देवगनने काजोलसोबत 'हलचल' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.
सुरुवातीला अजय देवगन-काजोल यांच्यात केवळ मैत्री होती. काजोल ज्यावेळी पहिल्यांदा अजयला भेटली, त्यावेळी अजय चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर एकटा बसला होता. अजयला एका किनारी एकटे बसायला आवडत असे. तो अधिक बोलायचा नाही. अजय देवगनला सुरुवातीला काजोल आवडायची नाही. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगनने आपल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला होता. अजय म्हणाला होता, "हलचल'च्या शूटिंगवेळी पहिल्यांदाच काजोलशी माझी भेट झाली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ती खूप बोलणारी, गर्विष्ठ मुलगी होती. आमच्या दोघांचा स्वभाव एकदम वेगळा होता. परंतु, आमच्या दोघांतील काही विचार, गोष्टींमुळे आम्ही जवळ आलो."
'हलचल' चित्रपटाच्यावेळी अजय देवगन आणि काजोल यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यावेळी अजय देवगन करिश्मा कपूरला तर काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती. काजोल आणि कार्तिक यांचे नाते टिकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच काजोल अजय देवगनच्या जवळ आली. काजोलच्या एन्ट्रीने अजय देवगन आणि करिश्मा कपूरच्या लव्ह स्टोरीचा एंड झाला. अजय आणि काजोलने महाराष्ट्रीयन पध्दतीने १९९९ मध्ये लग्न केले.