

डोंबिवली ; भाग्यश्री प्रधान आचार्य : राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाणे शहरातील डॉ. मूस रोड येथे उत्तरसभा घेतली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. मात्र यामध्ये लक्ष वेधून घेतले ते हनुमानाची प्रतिकृती करणाऱ्या अमरवीर सिंग यांनी परंतु यांना काही वेळातच राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्याऐवजी नौपाडा पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागले.
गुढीपाडव्याला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा त्याच्या समोरच हनुमान चालीसा लावू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशात या संदर्भात विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
या प्रतिक्रियांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा भरवली होती. या सभेत राज साहेबांचे अनेक फॅन्स सहभागी झाले होते.
यापैकीच एक असणारा अमर वीर हा अयोध्येवरून प्रवास करून आला होता. त्याने हनुमान यांची वेशभूषा करून संपूर्ण तलावपाळीला फेरफटका मारला. सगळ्या जणांचे लक्ष या हनुमानाने खेचले खरे मात्र त्याला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेत कार्यक्रम संपेपर्यंत या हनुमानाला पोलीस चौकीत बसवून ठेवले.
त्यामुळे राज साहेबांची सभा ऐकायला आलेल्या या हनुमानावर राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्याच्या ऐवजी पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागले.
यासंदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात विचारले असता कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हनुमान यांचा आवेश करून आलेल्या अमर विर सिंग यांना उचलले होते. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.