

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करा, अशा विनंतीची याचिका ॲड. जोशना तुली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. पालघर येथील श्रध्दाची हत्या करून अमानूष पध्दतीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लिव्ह इन पार्टनर आफताबने लावली होती. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते दिल्लीच्या विविध ठिकाणी टाकल्याची कबुली पोलिसांच्या जाळ्यात सापडलेल्या आफताबने दिली आहे.
श्रद्धाच्या हत्या प्रकरणामुळे दिल्ली आणि मुंबईच नव्हे तर सारा देश हळहळला आहे. हत्या प्रकरणाचा दिल्ली पोलीस तपास करीत असले तरी या प्रकरणामधील गुंतागुंत लक्षात घेऊन हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे दिले जावे, असे ॲड. तुली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांकडे असलेले अपुरे बळ, त्यांच्याकडे तांत्रिक आणि वैद्यकीय उपकरणांचा असलेला अभाव यामुळे देखील हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज असल्याचे ॲड. तुली यांनी सांगितले. गेल्या मे महिन्यात श्रद्धाची हत्या झाली होती तर काही दिवसांपूर्वी आरोपी आफताब पोलिसांच्या ताब्यात आला होता.