निवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा खून; फीसाठी पैसे न दिल्याने पत्नी, मुलाने केले सहा तुकडे | पुढारी

निवृत्त नौदल कर्मचाऱ्याचा खून; फीसाठी पैसे न दिल्याने पत्नी, मुलाने केले सहा तुकडे

कोलकाता वृत्तसंस्था :  तरुणीचा खून करून मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याच्या घटनेने देश हादरलेला असतानाच कोलकाता येथे एका माजी नौदल कर्मचाऱ्याचा त्याच्या पत्नी व मुलाने खून केला. मृतदेहाचे सहा तुकडे करून विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मुलांच्या फीसाठी पैसे न दिल्याने त्यांनी हे निर्घुण कृत्य केले..

२४ परगणा जिल्ह्यात बारुईपूर येथे ही घटना घडली. उज्ज्वल चक्रवर्ती (५५) असे मृताचे नाव आहे. श्यामली चक्रवर्ती आणि जय चक्रवर्ती हे मायलेक आरोपी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्लास्टिकच्या पोत्यात बांधलेले काही अवयव पोलिसांच्या हाती लागले आहेत; तर काही अवयव गायब आहेत. पोलिसांनी श्यामली आणि जय यांची शुक्रवारी या प्रकरणात चौकशी सुरू केली. प्रारंभी काहीही माहिती नाही, असेच ते बोलत राहिले. पण काही महत्त्वाच्या प्रश्नांवर दोघांच्या उत्तरांत विसंगती आढळल्यावर पोलिसांनी आणखी कसून चौकशी केली. त्यात दोघांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. त्यातून सत्य उघडकीला आले.

महाविद्यालयाची तीन हजार रुपये फी भरण्यासाठी जयने वडिलांना सांगितले असता त्यांनी पैसे द्यायला नकार दिला. त्यातच त्यांची वादावादी झाली. या दरम्यान त्यांनी जयला धक्का देऊन पाडले. त्यानंतर जयने त्यांचा गळा आवळून खून केला. या नंतर त्याने व त्याच्या आईने एका मोठ्या प्लास्टिकच्या पोत्यात मृतदेह भरण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्यावर दोघांनी सर्जिकल चाकूच्या मदतीने शरीराचे सहा तुकडे करीत ते पोत्यात भरले व एक पोते बारुईपूरच्या तलावात फेकून दिले तर बाकीचे अवयव इतरत्र नेऊन फेकले. पोलिसांना तलावातील पोते हाती लागले असून प्लास्टिकमुळे ते अवयव ओळखता आले. इतर अवयवांचा शोध सुरू आहे. उज्ज्वल निवृत्तीनंतर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. पण त्यांना दारूचे व्यसन असल्याने घरखर्चासाठीही पैसे द्यायचे नाहीत, असे श्यामलीने पोलिसांना सांगितले.

 

Back to top button