

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि. ५) होत आहे. दांता मतदारसंघातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारांनी आपल्यावर भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. (Gujarat Election update)
गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujarat Election 2022) साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदानाच्या काही तास आधी दांता मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार कांती खराडी संशयास्पदरित्या बेपत्ता झाले. मात्र, सुमारे अडीच तासांनंतर ते सुखरूप सापडले. यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मी माझ्या समर्थकांसह एका वाहनात बामोदरा चारमार्गे जात होतो, तेव्हा भाजप उमेदवाराने आमचा मार्ग अडवला. त्यानंतर आम्ही परतण्याचा निर्णय घेतला, त्याच दरम्यान आणखी लोकांनी येऊन माझ्यावर भाजपचे उमेदवार पारघी व अन्य दोघे हत्यारे व तलवारी घेऊन आले. आम्ही घटनास्थळावरुन पलायन केले. 10-15 किमी पळत सुटलो. दोन तास जंगलात मुक्काम केला."
कांती खराडी हे गेल्या 10 वर्षांपासून अनुसूचित जमाती राखीव असणार्या दांता मतदारसंघातील आमदार आहेत. यंदा काँग्रेसकडूनकांती खराडी तर भाजपकडून लधूभाई पारघी रिंगणात आहेत.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही काँग्रेस उमेदवार आणि विद्यमान आमदार खराडी यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा ट्विट करून निषेध केला आहे. 'काँग्रेसचे आदिवासी नेते आणि दांता विधानसभेचे उमेदवार कांतिभाई खराडी यांच्यावर भाजपच्या गुंडांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. खराडी बेपत्ता आहेत', असा आरोप ट्विट राहुल गांधी यांनी केला होता. गुजरात काँग्रेसचे नेते जिग्नेश मेवाणी यांनी खराडी यांनी लिहिलेले पत्र निवडणूक आयोगाला शेअर केले आहे. यामध्ये खराडी यांनी मारहाणीचा आरोप केला आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाले असून, ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. उत्तर आणि मध्य गुजरातमधील 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 25 दशलक्ष मतदार 833 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा