

विटा : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील दुचाकी चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून तब्बल ७ लाख ४५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल प्रशांत पाटील (वय २३), महेश शामराव वीर (वय १९, दोघे राहणार शाहुनगर, विटा), अमृत राजेंद्र काळोखे (वय २२, रा. शाळशिंगे रोड, विटा) आणि राहुल गजानन जाधव (वय २१, रा.शामराव नगर, सांगली) या संशयित आरोपींना विटा पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेली माहितीनुसार, १३ मे रोजी रात्री माहुली येथुन शब्बीर चंदुलाल तांबोळी यांनी दुचाकी चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार अधिक तपास केला असता राहुल जाधव व विशाल पाटील यांनी मोटर सायकल चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. याबाबत अधिक तपास केला असता विटा एसटी स्टँड परिसरात हे दोघे संशयीत असल्याचे माहिती मिळाली. त्यांना स्टँड परिसरातून ताब्यात घेतले व त्यांच्याकडून कसुन तपास केला असता विशाल पाटील, अमृत काळोखे, महेश वीर व राहुल जाधव या चौघांनी विटा, म्हसवड, वडुज, खानापूर, कराड अशा विविध ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याचे कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ९ विविध कंपन्यांच्या दुचाकी असा एकूण ७ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले व उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्त्वाखाली राजेंद्र भिंगारदेवे, अमरसिंह सुर्यवंशी, सुरेश भोसले, शशिकांत माळी, अंकुश लुगडे, रोहीत पाटील, सागर निकम, अक्षय जगदाळे, रविंद्र धादवड, नंदकुमार मदने, अजय लांडगे, विशाल कोळी अदि पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकाने केले.
हेही वाचलंत का?