कोल्हापूर : मोटार तोडफोड प्रकरणातील संशयित तरुणावर खुनी हल्ला, मंगळवार पेठेत तणाव | पुढारी

कोल्हापूर : मोटार तोडफोड प्रकरणातील संशयित तरुणावर खुनी हल्ला, मंगळवार पेठेत तणाव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पेठ पद्मावती मंदिर परिसरात आठवड्यापूर्वी झालेल्या अलिशान मोटारीच्या तोडफोड प्रकरणातील संशयित स्वप्नील बाळकृष्ण तावडे (वय-३०, रा. माळी गल्ली, मंगळवार पेठ) याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. शुक्रवारी घरात घुसून हा हल्ला झाल्याने मंगळवार पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दांडक्यासह धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात स्वप्नील गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्लेखोर कुणाल किरण गवळी (वय-३०, रा. माळी गल्ली, मंगळवार पेठ) याच्या विरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेनंतर संशयित पसार झाला आहे. पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शनिवार दिनांक २३ जुलै रोजी मंगळवार पेठ येथील पद्मावती मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोटारींची तोडफोड झाली होती. या संशयातून बाळकृष्ण तावडे याच्याविरोध सिद्धीविनायक गवळी याने फिर्याद दाखल केली होती. राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. दोन दिवसांपूर्वी त्याची जामीनावर सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर संशयित तावडेचा फिर्यादी सिद्धीविनायक आणि त्याचा भाऊ कुणाल याच्याशी वाद झाला होता.

माझ्याविरोधात कशाला खोटी फिर्याद दाखल केलीस? असा त्याने गवळी बंधूना जाब विचारला. या कारणातून त्यांच्यामध्ये जोरात खडाजंगी झाली होती.

आज सकाळी स्वप्निल तावडे हा घरात झोपला असताना संशयित कुणाल गवळी त्याच्या घरात घुसला. त्याने लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. मारहाण होताच तावडे जीवाच्या आकांताने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. संशयित गवळी याने पाठलाग करून त्याच्या हातावर पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

अतिरक्तस्राव होऊन तावडे याची प्रकृती गंभीर आहे. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नी शुभांगी बाळकृष्ण तावडे यांनी संशयितांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित कुणाल गवळी पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितले आहे.

Back to top button