मद्यधुंद अवस्थेतील झटापट बेतली जीवावर

मद्यधुंद अवस्थेतील झटापट बेतली जीवावर
Published on
Updated on

डिचोली, पुढारी वृत्तसेवा : बंदरवाडा डिचोली येथे रविवारी (दि. 20)रात्री दोन मित्रांमध्ये मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून झालेल्या झटापटीत एका मित्राने दुसर्‍या मित्राच्या डोक्यावर दगड हाणण्याची घटना घडली. या घटनेत गावकरवाडा डिचोली येथील अरुण अशोक परब (40) हा जागीच गतप्राण झाला. झटापटीत रामेश्वर प्रशांत वाडकर (21) हाही जखमी झाला होता. त्याला इस्पितळातून सोडल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हा प्रकार आपल्या हातून घडल्याचे कबूल केले.

डिचोली पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री 10.30 वा. च्या सुमारास बंदरवाडा डिचोली येथील दुग्ध उत्पादन सोसायटीजवळ घडली. मयत अरुण परब व संशयित रामेश्वर वाडकर यांच्यात गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादाच्या दरम्यान अरुण याने रामेश्वरला शिवीगाळ केली होती. हा वाद झाल्यानंतर रविवारी, दि. 20 रोजी दोघेही एकमेकांना भेटले आणि त्यांच्या मद्यप्राशनाचा बेत झाला. डिचोली बाजारातील एका मद्यालयातून दारू पार्सल घेतले. ती प्राशन केल्यानंतर चालतच त्यांनी बाजारातील एका गाड्यावर ऑम्लेट पावही बरोबरच खाल्ला. तेथून बसस्थानकाजवळून बंदरवाडा मार्गे गावकरवाडा येथे जात असतानाच बंदरवाडा येथे दुग्ध उत्पादन सोसायटीजवळ त्यांच्यात वाद झाला.

पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोघांनाही रुग्णवाहिकेतून डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे अरुण याला मृत घोषित करण्यात आले. रामेश्वर याला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. सकाळी त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर डिचोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा प्रकार आपल्या हातून घडल्याचे कबूल केले. तत्पूर्वी डिचोली पोलिसांनी बाजार परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. त्यातून काही माहिती गोळा केली. तसेच त्यांनी रात्री एकत्रितपणे ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या त्याही ठिकाणी त्यांची चौकशी केली.

घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक, श्वानपथक यांनाही पाचारण करण्यात आले. डिचोली पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर यांनी, तसेच पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून आवश्यक गोष्टी जप्त केल्या. सध्या रामेश्वर वाडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना, डिचोली उपअधीक्षक सागर एकोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गडेकर अधिक तपास करीत आहे.

वादाचे पर्यवसान भांडणात

गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्या वादाच्या दरम्यान अरुण याने रामेश्वरला शिवीगाळ केली होती. त्यानंतर रविवारी दोघेही भेटले आणि मद्यप्राशनाचा बेत केला. यावेळी झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात झाले. दोघांमध्ये बरीच झटापट झाली. एकमेकांना जमिनीवर पाडल्यानंतर रामेश्वर याच्या हाती दगड लागला आणि त्याने तो थेट अरुणच्या डोक्यावर हाणला. दगड हाणताच रामेश्वरही खाली कोसळला आणि त्यालाही जखम झाली. तो खाली पडून तडफडत असताना तेथे आलेल्या लोकांनी पोलीस व 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधला.

पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news