

पणजी : राज्यात बेकारी वाढली असून सरकारी नोकऱ्या दिल्या जात नाहीत. सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांचा आता गोव्यातील युवकांवर परिणाम होत आहे, हे युवक एक दिवस खवळून उठतील. त्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभेत प्रश्नोत्तरी तासाला आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदांची संख्या आणि सरकारने जाहिरात देवून भरण्याचा प्रयत्न केलेल्या पदांची माहिती मागणारा एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर मिळालेल्या उत्तरात विविध सरकारी खात्यात एकूण ६१७५ पदे रिक्त आहेत आणि फक्त १०२ पदांची भरती करण्यासाठी सरकारने जाहिरात दिली आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे असे म्हणाले की, आपण गोवा विधानसभा संकुलाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती मागणारा प्रश्न सादर केला होता. सभापतींनी हा प्रश्न अमान्य करून विचारात घेण्यात आलेला नाही त्याचे कारणही दिलेले नाही. लोकशाही संपुष्टात आणायचा भाजपचा हा डाव आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
प्रश्नोत्तरी तास रद्द करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असंविधानिक आहे. त्यावर विरोधक गप्प बसणार नाहीत. संविधानिक पद्धतीने त्यावर तोडगा काढला जाईल पण माफी मागितली जाणार नाही असे ते म्हणाले.