गोवा : काँग्रेसच्या विमानाचे युरी आलेमाव पायलट

गोवा : काँग्रेसच्या विमानाचे युरी आलेमाव पायलट
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी पेशाने पायलट असलेले आमदार युरी आलेमाव यांची निवड झाल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याविषयी विधान केले आणि युरी आलेमाव काँग्रेसच्या विमानाचे पायलट असल्याचे जाहीरही केले.

काँग्रेसमध्ये निर्णयाला प्रचंड विलंब होतो, या समजाला या गतीने छेद दिला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. कार्लुस फेरेरा यांनी गोवा फॉरवर्डच्या विलीनीकरणाविषयी विधान केले. त्यावर आमदार सरदेसाई यांनी तसा प्रस्ताव आल्यास पाहू, अशा आशयाचे उत्तर दिले. त्यास एक तास उलटण्यापूर्वीच पक्षाने घाईगडबडीत युरी यांचे नाव काँग्रेस विधिमंडळ नेते पदी निश्चित करून सरदेसाई यांचा पत्ता कापला. गिरीश आणि सरदेसाई यांच्यात विस्तवही जात नाही, हे उघड गुपित आहे. गोवा फॉरवर्डच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाला चोडणकर यांचा पूर्वीपासून विरोध आहे. अशा स्थितीत दोन महिने रिक्त असलेल्या विधिमंडळ नेतेपदी अचानक निवड करून सरदेसाई यांच्या हाती 'नारळ' दिल्याची चर्चा सुरू झाली.

फेरेरा यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेस पक्षात विलीन करावा, विजय यांना आपण विद्यार्थी दशेतून ओळखतो, त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यास काँग्रेस आणखी मजबूत होईल, असे फेरेरा यांनी म्हटले होते. त्यावर एखादा पक्ष दुसर्‍या पक्षात विलीन करणे ही साधी गोष्ट नाही, काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करू, असे सरदेसाई यांनी उत्तर दिले होते. विलीनीकरणावर सकारात्मक चर्चा सुरू असताना अचानक युरी यांच्या निवडीची ब्रेकिंग न्यूज करण्यात आली.

विधानसभेतील कसलेले नेते सरदेसाई काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलेल्या तिन्ही आमदारांमध्ये अनुभवी आहेत. गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलिन झाल्यास सरदेसाई विधिमंडळ नेतेपदी नेमले जाऊ शकतात. त्याबाबतची चर्चा सुरु असताना अचानक निवड झाल्याने चर्चांना तोंड फुटले. सरदेसाई यांच्यासमोर काँग्रेसने बर्‍याच पुर्वी विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यावेळी सरदेसाई यांनी त्याला नकार दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news