

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. बिहारात जंगलराज, उत्तर प्रदेशात गुंडाराज, तर गोव्यात हप्ताराज व भ्रष्टाचार सुरू आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला; मात्र त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याकडे सरकारने सोयीस्करपणे दुर्लक्ष करून संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मिठागाराची जागा बेकायदेशीररीत्या रूपांतरीत करून नाईट क्लब उभारण्यात आल्याचे नंतर सिद्ध झाले. हा अपघात किंवा राष्ट्रीय आपत्ती नसून, सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेला खून असल्याचे आलेमाव म्हणाले. या प्रकरणाचा अहवाल अद्याप सरकारने जाहीर केलेला नाही. राज्यातील हप्ताराज संपवण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यपालांच्या भाषणावर त्यांनी जोरदार टीका करताना राज्यपालांनी आपल्या अभिषणात कुशावती जिल्हा, श्रीराम पुतळा आदी विषयांचा उल्लेख केला मात्र हडफडे येथील या दुर्घटनेचा काहीच उल्लेख केलेला नाही. त्यांचे हे भाषण म्हणजे सरकारची जाहिरात असून, कायदा व सुव्यवस्था आणि लोकांच्या सुरक्षेसंदर्भात बोलणे आवश्यक होते, असे त्यांनी नमूद केले.
गोव्यात दिवसाढवळ्या चोरी, दरोडे, भूखंड हडप, गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध तसेच खुलेआम गोळीबार असे प्रकार वाढले असून, चोरी हा जणू दुय्यम व्यवसाय बनला आहे. गृहखात्याच्या अखत्यारीत असलेल्या पोलिस बदल्यांमध्ये राजकारण होत असल्याचे सांगत, गोव्यात कायदा व सुव्यवस्था नसून 'जमीन आणि आदेश'च चालतात, असा आरोप त्यांनी केला.
हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन प्रकरणात २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे सरकार जागे झाले. तोपर्यंत या सरकारने कधीच राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसाय तसेच बांधकामे याकडे दुर्लक्षच केले होते. या घटनेनंतर सरकारी यंत्रणा काही प्रमाणात सक्रिय झाली.
क्लबला अग्निशमन दलाचा परवाना देण्यात आला होता, याची माहितीच दलाच्या प्रमुखांना नसल्याचे त्यांच्या स्पष्टीकरणावरून स्पष्ट होते, असे आलेमाव म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या ७५ भंगार अड्ड्यांकडे कोणतेही वैध दाखले नसताना पोलिस काय झोपले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फर्दिन रिबेलोंच्या निवेदनावर भूमिका मांडा...
एमपीटीवरील कोळसा हाताळणीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत, माजी न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांच्या नेतृत्वाखालील चळवळीबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही युरी आलेमाव यांनी केली.