

पणजी : पुढारी वृत्तसेवा
चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्पाबाबत दररोज नवनवीन कथानक तयार केले जात असून, सत्य मात्र एकच आहे, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर स्पष्ट व ठाम भूमिका मांडली आहे. मंत्री खंवटे म्हणाले की, चिंबलमधील काही लोकच या प्रकल्पाला विरोध करत असून, युनिटी मॉल हा गोव्याच्या हिताचा प्रकल्प आहे.
सरकार या विषयावर अंतिम निर्णय घेईल. लोकांना हवे ते बोलू द्या. हजार खोट्या गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, पण सत्य एकच असते, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आपण युनिटी मॉल प्रकल्पाबाबत अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली असून, कोणतेही दिशाभूल करणारे विधान केलेले नाही, असेही खंवटे यांनी ठामपणे नमूद केले.
दरम्यान, युनिटी मॉल प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून, विकास आणि राज्यहित लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असा संदेश मंत्री खंवटे यांनी दिला आहे. मंत्री खंवटे म्हणाले, सरकारकडून कार्निव्हल समित्यांना एकत्रित अनुदान दिले जाते. त्यानंतर विविध फ्लोट्ससाठी दिली जाणारी बक्षीस रक्कम कशी वाटप करायची, याचा निर्णय संबंधित कार्निव्हल समित्या स्वतंत्रपणे घेतात.
फ्लोट्सच्या विविध श्रेणी असतात आणि त्या-त्या श्रेणीतील बक्षीस रकमेचे वाटप सरकारकडून नव्हे, तर संबंधित समित्यांकडून ठरवले जाते. हा मुद्दा आमदार नीलेश काब्राल आणि आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार...
मंत्री खंवटे म्हणाले, आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आर्थिक पैलू आहेत. त्यामुळे या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली करून अनुदानात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.