

यवत: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी यवत मधील मुक्काम आटोपून पुढील मुक्कामाच्या ठिकाणी वरवंड कडे मार्गस्थ होत असताना वारीच्या वाटेवर असणाऱ्या केडगाव चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्र च्या वतीने वारीमधील वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी लावण्या आणि अभंग यांची जुगलबंदी सादर करण्यात आली.
गेली 32 वर्ष ही परंपरा या कला केंद्राने अखंडित पणे सुरू ठेवली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू वरून निघाल्यानंतर वारीच्या वाटेवर अनेक नागरिक पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करतात तसेच या कला केंद्रातील महिला कलावंत देखील आपली कला सादर करून एक वेगळा भाव जपतात आम्हाला वारीत सहभागी होता येत नाही म्हणून आम्ही येथूनच पांडुरंगला नमन करून ही सेवा अर्पण करतो असे सांगतात. (Latest Pune News)
शिवाय अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ अशोक जाधव व जयश्री जाधव यांच्या कडून 10 हजार वारकऱ्यांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कला केंद्रच्या समोरील बाजूस मोठे स्टेज उभा करून त्यावर कला केंद्रामधील महिला कलावंत आपली कला सादर करतात. यावेळी मोठ्या प्रमाणात वारीमधील भाविक या ठिकाणी कला पाहण्याचा आनंद घेतात. तर काही भाविक या ठिकाणी नाचण्याचा देखील आनंद लुटतात व वारीत आलेला शीण घालवत पुढील वरवंड मुक्काम साठी रवाना होतात.
लावणी कलावंत मनोभावे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करतात कलावंतांना पंढरपूरला जाता आलं नाही तरी वारकर्यांच्या मध्येच ते विठ्ठलाला शोधत असतात आणि यातूनच समाधान मिळवतात.