

पणजी : चोडण येथे जेटीवर नांगरून ठेवलेली फेरीबोट सोमवारी सकाळी मांडवी नदीत अचानक बुडाली. चोडण-रायबंदर जलमार्गावरील ही फेरीबोट चोडण येथे नांगरलेली होती. या फेरीबोटीत कर्मचारी आणि त्यांच्या ताब्यातील तीन दुचाकी होत्या. या तिन्ही दुचाकी पाण्यात बुडाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दैनंदिन प्रवासासाठी चोडण-रायबंदर फेरीमार्गाचा वापर करणार्या शेकडो प्रवाशांसाठी नदी परिवहन खात्याने एकूण पाच फेरीबोटी उपलब्ध केलेल्या आहेत. यापैकी आज दुर्घटनाग्रस्त झालेली फेरीबोट वगळता उर्वरित चार बोटी सुरळीतपणे कार्यरत होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या वाहतुकीत अडथळा झाला नाही.
सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास चोडणच्या बाजूला मांडवी किनार्यावरील नांगरून ठेवलेली बेती नावाची फेरीबोट बुडाली. या फेरीबोटीत 3 कर्मचारी झोपले होते मात्र त्यांनी लगेच पळ काढल्यामुळे या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना जलवाहतूक व्यवस्थेतील निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे. आलेमाव यांनी या घटनेची तत्काळ व स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. संबंधित बोटीचा अहवाल, तपासणी, देखभाल यांची नोंद व खात्याच्या जबाबदार्या पारदर्शकपणे जनतेसमोर आणाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
फेरीबोट नेमकी कशी बुडाली? यात काही निष्काळजीपणा होता की नाही, हे अद्याप समजलेले नाही. त्याची चौकशी केली जाईल. परंतु, कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरीबोटीत सहा टाक्या आहेत, ज्या फेरीबोटीला तरंगत राहण्यास मदत करतात. हे एअर टँक आहेत. मुसळधार पावसात, कधी कधी या टाक्यांमध्ये पाणी साचू शकते. त्यामुळे फेरीबोट बुडण्याची शक्यता आहे. या घटनेमागील वस्तुस्थिती जाणून घेऊ, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.