

वास्को : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण वास्कोचा कायापालट करून एक सुंदर असे शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी नागरिकांनी योग्य ते सहकार्य केल्यास बरेच प्रश्न मार्गी लागतील, असे नगरसेविका शमी साळकर यांनी सांगितले. दरम्यान, स्वातंत्र्यपथाच्या सौंदर्याकरण कामाला शुक्रवारी १६ रोजी आरंभ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात पे पार्किंगचा प्रारंभकरण्यात आला. याप्रसंगी शमी साळकर बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर उपस्थित होते. वाहतुकीमध्ये शिस्त यावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. काहीजण चारचाकी वाहनांच्या जागी दुचाकी उभ्या करतात. काहीवेळी इतर वाहनांना अडथळा करून वाहने उभी केली जातात.
काहीजणानाकडून दुहेरी पार्किंग केली जाते. काहीजणांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागत होता. तो पे पार्किंगमुळे संपणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पे पार्किंगमुळे गरजूवंतांची मोठी सोय होणार आहे. वास्को शहराकडे एक नियोजनबद्ध शहर म्हणून पाहिले जात होते.
ती प्रतिमा पुन्हा तयार करण्याची आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वाहनचालकांमध्ये शिस्त यावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष बोरकर यांनी सध्या चार ठिकाणी पे पार्किंग सुरू करण्यात आल्याचे सांगितले. येथील नम्रता सिलेक्शन ते रोशन महाल, पोस्ट कार्यालयाच्या समोर, उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशी ठिकाणी पे पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.
यामुळे नागरिकांची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना वाहन पार्किंगसाठी जागा शोधण्यास फेरया माराव्या लागत होत्या. त्या आता बंद होणार आहेत. काही वाहनचालक नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करून इतरांना अडथळा करतात. त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले.